

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजप कार्यकर्त्यांच्या अलीकडील बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत नाराजी आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेत भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी स्वतंत्रपणे वन टू वन चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षाच्या कामकाजाबाबत तसेच स्थानिक पातळीवरील काही मुद्द्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत मतभेद वाढू नयेत यासाठी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पुढाकार घेतला आहे.
दामू नाईक यांनी सांगितले की, सुभाष फळदेसाई यांच्याशी त्यांचे यापूर्वीच बोलणे झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांची फळदेसाई यांच्यासोबत वन-टू-वन बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षातील सध्याच्या परिस्थितीवर तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना दामू नाईक यांनी सुभाष फळदेसाई यांच्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. "फळदेसाई माझे शत्रू नाहीत," असे त्यांनी सांगितले. पक्षाच्या हितासाठी आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर सुभाष फळदेसाई, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.दामू नाईक