

मडगाव : नियमांना फाटा देत पावसात पाणी भरत असणार्या सकल भागात खडी क्रशरला परवाना देणार्या सावर्डे पंचायतीचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. सदर खडी क्रशरला सरपंच चिन्मयी नाईक यांनी तात्पुरता परवाना दिला. त्यानंतर चिन्मयी नाईक या रजेवर गेल्याने सरपंच पदाचा अतिरिक्त ताबा असलेल्या उपसरपंच नितेश भंडारी यांनी त्या क्रशरला पुढील सहा महिन्यांसाठी दुसरा परवाना दिला होता. याविषयीचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ मधून प्रसिद्ध होताच सावर्डेच्या काँग्रेस पदाधिकार्यांनी सरपंच नाईक यांना घेराव घालत हा क्रशर पुन्हा सुरू झाल्यास काँग्रेस कार्यकर्ते तो बंद पाडतील, असा इशारा दिला आहे.
सावर्डे पंचायत क्षेत्रातील गुड्डेमळ प्रभागात या खडी क्रशरला पंचायतीने परवाना दिला आहे. एकूण दोन वेळा जारी केलेल्या तात्पुरत्या परवान्याच्या आधारावर पणजी स्थित एका व्यावसायिकाने सखल भागात हा क्रशर उभारला आहे. सावर्डे पंचायतीने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी या क्रशला परवाना दिला होता. सहा महिन्यांच्या कार्यकाळात अन्य खात्यांचे परवाने घेऊन क्रशर सुरू करावा, असे अर्जदाराला सुचित करण्यात आले होते. मात्र सहा महिन्यात त्यांनी कोणत्याही खात्याचा परवाना मिळविला नाही. शिवाय परवान्याचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे त्याने पुन्हा तात्पुरता परवाना मिळावा यासाठी सावर्डे पंचायतीकडे अर्ज केला होता. त्याच दरम्यान सरपंच नाईक या रजेवर गेल्यामुळे उपसरपंच नीतेश भंडारी यांनी या खडी क्रशरला सलग दुसर्यांदा परवाना दिल्याचे उघड झाले आहे.
या प्रकाराचे वृत्त प्रसिद्ध होताच सावर्डे गट काँग्रेसचे अध्यक्ष संकेत भंडारी, गौतम भंडारी, स्वप्निल भंडारी व अन्य ग्रामस्थांनी पंचायतीवर धडक देत सरपंच नाईक यांना घेराव घालून जाब विचारला. या बेकायदा क्रशरवर कारवाई करण्यास तुम्हाला कोण रोखत आहे, असा प्रश्न विचारत हा क्रशर कायदेशीर सुरू करण्यास आम्हाला हरकत नाही. मात्र, नियमबाह्य प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊ नये असे ते म्हणाले. हा क्रशर पुन्हा सुरू केल्यास तो बंद पाडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेस गटाचे अध्यक्ष संकल्प भंडारी यांनी या क्रशरवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
या क्रशरसाठी 40 झाडे कापण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात 80 पेक्षा जास्त झाडांची कत्तल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. दैनिक पुढारीच्या वृत्ताची दाखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करणार्या वन खात्याच्या अधिकार्यांनी ही झाडे वार्यामुळे उन्मळून पडली असावीत, असा जावई शोध लावला आहे. सदरचा प्रकल्प सरकारी जमिनीत असल्यामुळे वन अधिकार्यांचे धाबे दणाणले असून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सरपंच चिन्मयी नाईक म्हणाल्या, पंचायत क्षेत्रातील विकासकामे मार्गी लावताना आपण कधी पक्षीय राजकारण केले नाही. परवाना देण्यापूर्वी त्या जमिनीच्या कागदपत्रांची पाहणी करण्यात आली होती. सहा महिन्यांचा तात्पुरता परवाना संपुष्टात येताच आपण त्या अर्जदाराला पत्र करून उर्वरित परवाने पंचायतीला सादर करावे असे सुचित केले होते. पण त्यानंतर त्या अर्जदाराने पुन्हा तोंड दाखवलेले नाही. सदर क्रशरची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.