

मडगाव : पुढारीने वर्तवलेली शक्यता अखेर खरी ठरली आहे. पर्यटन विकास महामंडळाचा काउंटर काढुन टाकण्याबरोबर ती वादग्रस्त ऑनलाइन सेवा रद्द करण्याची मागणी करत दूधसागर टूर्स ऑपरेट्स संघटनेचे सदस्य उपोषणाला बसले होते. तीच संधी साधत पर्यटकांना घेऊन जीपगाड्या दूधसागरावर पाठवण्यास सुरू केल्यामुळे कुळेत तणाव भडकला आहे.दूधसागर देवाला वाहिलेल्या नारळाचा अवमान करुन परस्पर जीप सेवा सूरु करण्यात आल्यामुळे संतप्त जीप मालकांनी रस्त्यावर ठिय्या मारत जीप गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांना रोखण्यासाठी सुमारे तीनशे पोलिसांची फौज उभी करण्यात आली होती.पण जीप मालकांच्या एकीपुढे अखेर शासनाला गुढगे टेकावे लागले.ती वादग्रस्त ऑनलाइन सेवा तात्पुरती बंद करून सर्व जीप गाड्या ऑफलाईन पध्दतीने सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
आठ कोटी रुपयांचा गफला झालेल्या त्या ऑनलाइन बुकिंग सेवे वरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे,कुळे येथील गोवा पर्यटन विकास महामंडळाचा तो काउंटर काढून टाकण्याची मागणी जीप मालक संघटनेने केली आहे. स्थानिक आमदार गणेश गावकर संपूर्ण जीप सेवा पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकारा खाली घेऊ पाहत आहेत.त्यासाठी त्यांनी एक खासगी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे.पण जो पर्यत दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेकडे करार होत नाही तोपर्यंत ती सेवा लागू होणे अशक्य आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडुन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला होता.पण आमदार गावकर जीप मालकांच्या मागण्या मान्य करण्याच्या विरोधात असल्याने तोडगा निघू शकलेला नाही.त्या पार्श्वभूमीवर शनिवार पासून दोन दिवस साखळी उपोषण करण्याचा निर्णय जीप मालक संघटनेने घेतला होता. शनिवारी सकाळी दूधसागर देवाला नारळ अर्पण करुन गाऱ्हाणे घातले गेले.
जीप मालक उपोषणाला बसतील याची पूर्वकल्पना आमदार गावकर यांना होती.त्याच मुहूर्तावर दूधसागरावर जाण्यासाठी पर्यटकांसाठी जीप सेवा सुरू करण्यात आली. दुधसागर टूर ऑपरेटर संघटनेच्या कराराशिवाय ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आली होती. ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आल्याने पर्यटकांनी शुक्रवार पासुन नोंदणी करण्यास सुरू केले होते. त्या सर्वांना कुळे येथे आणुन थेट जीप मध्ये बसवण्यात आले .जीप मालक संघटनेचा विरोध मोडित काढण्यासाठी पोलीस फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला होता.
आपल्याच पैकी काही जीप मालक पर्यटकांना घेऊन दूधसागरावर गेल्याचे कळताच आंदोलन करणारे जीप मालक आणि त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मारला. कोणत्याही स्थितीत जीप गाड्या सोडणार नाही अशी भूमिका त्यानी घेतली होती.दूधसागर देवासमोर घातलेल्या गाऱ्हाण्याचा अपमान करून नारळ ओलांडलेल्यांना देवच पाहून घेईल असे अध्यक्ष नीलेश वेळीव म्हणाले.
या आंदोलनात महिला आणि वृद्ध सुद्धा सहभागी झाले होते. तणाव वाढत चालल्याने उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर घटनास्थळी दाखल झाले. माजी खासदार विनय तेंडुलकर यांनीही लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला.पण पर्यटकांना दुधसागरावर नेणाऱ्या जीप गाड्याना ती ऑनलाइन सेवा लागू होऊ शकत नाही. त्यामुळे ती ऑनलाइन सेवा तात्काळ बंद करून ऑफलाईन पद्धतीने आणि तेही रोटेशन तत्वावर स्टॅण्ड वरुन गाड्या सोडल्या जाव्यात या मागणीवर आंदोलक ठाम होते. अखेर विनय तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यांशी फोन वरून संपर्क साधला आणि त्यांच्या सूचनेनुसार ऑफलाईन पद्धतीने वाहतुक सूरु करण्यात आली.