

मडगाव : किडे पडलेल्या विहिरीतील पाण्याचा वापर करून हॉटेलमधील पदार्थ तयार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार खारेबांध मडगाव येथे समोर आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न आणि औषध प्रधिकरणाने (एफडीए) त्या हॉटेलसह एका ड्रायफ्रूट्सच्या दुकानाला टाळे ठोकले. हॉटेलसाठी वापरण्यात येणार्या विहिरीतून पाणी काढले असता त्यात पडलेले किडे पाहून एका अधिकार्याने तिथेच उलटी केली.
सोमवारी खारेबांध मडगाव येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी छापा टाकत हॉटेलची तपासणी केली. हॉटेलच्या मागे असणार्या एका पडक्या विहिरीतील पाण्याचा वापर करून हॉटेलमधील खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचे त्यांना आढळून आले. पाण्याचे नमुने घेतले असता त्यात अक्षरश: किडे आढळून आले.
स्वयंपाक घरात अक्षरश: उंदरांच्या लेंड्या पडलेल्या आढळल्या. विहिरीच्या बाजूलाच स्वयंपाक घरातील सांडपाणी सोडण्यात आले होते. हे सांडपाणी विहिरीत पाझरल्यामुळे विहिरीच्या पाण्यात किडे वळवळत असल्याचे त्यांना दिसून आले. एका कॉलेजच्या परिसरात असणार्या या हॉटेलला तत्काळ सील ठोकण्यात आले आहे. या हॉटेल जवळ असलेल्या मिठाईच्या दुकानात त्याच प्रदूषित विहिरीचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येतात अधिकार्यांनी पाहणी केली असता दुकानातील सर्व पदार्थ कालबाह्य झाले होते. तरीही दुकान मालकाकडून त्या वस्तूंचे प्रदर्शन मांडून त्यांची विक्री केली जात होती. या दुकानालाही सील ठोकण्यात आले.
‘एफडीए’च्या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. मडगावात सुरू असलेल्या फेरीतील काही दुकानांची पाहणी केली असता साफसफाईच्या बाबतीत त्यांनी नियम पाळल्याचे त्यांना आढळून आले. विक्री केल्या जाणार्या पाण्याच्या बाटल्यांबाबत संशय आल्यामुळे तपासणीसाठी काही बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.