

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मांद्रे पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत मोरजी येथील बांदेकरवाडा परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून दोन सेनेगाली नागरिकांसह एकूण तीन संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत २२२.९२ ग्रॅम वजनाचा कोकेनसदृश पांढऱ्या रंगाचा पावडरसदृश पदार्थ जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे २२ लाख २९ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील बौबा सांबा (वय ३१) हा सेनेगलचा नागरिक असून तो मोरजी येथील बांदेकरवाडा परिसरातील ग्रीनव्ह्यू गेस्ट हाऊसमध्ये राहत होता. त्याच्यासोबत अलिऊ मुस्ताफा (वय ३१) या अन्य एका सेनेगाली नागररालाही ताब्यात घेण्यात आले. तोदेखील याच गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईदरम्यान संशयितांच्या ताब्यात बेकायदेशीररीत्या ठेवलेला पांढऱ्या रंगाचा पावडरसदृश पदार्थ आढळून आला. हा पदार्थ कोकेन असल्याचा पोलिसांना संशय असून, त्याचे एकूण वजन २२२.९२ ग्रॅम आहे. जप्त करण्यात आलेल्या या संशयित अमली पदार्थाची अंदाजे किंमत २२ लाख २९ हजार २०० रुपये आहे. याशिवाय पोलिसांनी संशयितांकडून १० लाख ८५ हजार ३०० रुपयांची रोकड तसेच इतर साहित्य जप्त केले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे ३३ लाख १४ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.