स्वच्छ, सुंदर, हरित गोव्यासाठी सज्ज व्हा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी : गोवा स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या आहे तो आपण पार पाडण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
क्रांती दिनानिमित्त पणजी येथील आझाद मैदानावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत, जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर, ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू , गोवा-दमण-दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला विविध शाळांतील विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोवा क्रांती दिन हा गोमंतकीयांच्या स्वातंत्र्यलढ्याचा महत्त्वपूर्ण दिवस असून या दिवशी 1946 रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीची हाक दिली. त्यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, 18 जून हा केवळ ऐतिहासिक दिवस नाही, तर जनजागृतीचा दिवस आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या पिढीने जबाबदारीने काम केले पाहिजे. स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि शिस्तबद्ध जीवन हेच खरे आजचे राष्ट्रधर्म आहे.
डॉ. सावंत यांनी पर्यावरण रक्षणासाठी नवीन पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन करत म्हटले, आपल्या गोव्याला स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी आपण एक नवी क्रांती सुरू केली पाहिजे. ही क्रांती शस्त्रांची नाही, तर स्वभावातील बदलाची आणि सामाजिक शिस्तीची आहे. यावेळी राज्यपाल पिल्ले यांनी गोवा मुक्ती लढ्यातील डॉक्टर लोहिया यांची भूमिका याविषयी माहिती दिली तर बालभवनच्या विद्यार्थ्यांनी भक्ती गीते सादर केली.

