

पणजी : मंत्रिमंडळातील फेरबदल हा आता कळीचा मुद्दा बनला आहे. हे बदल येत्या चार दिवसांत होतील, अशी शक्यता असून यासाठीच सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना दिल्लीत बोलाविण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी यासंबंधी केंद्रीय नेते आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यात सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात सप्टेंबर 2022 पासून मंत्रिमंडळात फेरबदल होणार, अशा केवळ चर्चाच सुरू आहेत. आता या संदर्भात, येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष नाईक आणि आरोग्यमंत्री राणे दिल्लीत पोहोचले आहेत. मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे? याचा भविष्यातील तिन्हीही निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो? आणि ज्यांना मंत्रिमंडळातून वगळावयाचे आहे, त्याचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो? याबरोबरच इतर बाबतीत पक्षीय नफा-तोटा लक्षात घेऊनच हा निर्णय होणार आहे. तूर्तास दोन मंत्रिपदे बदलण्यात येणार असून पुढील काही दिवसांत अन्य दोन मंत्रिपदांबाबत विचार होणार आहे. यासाठी पक्षाचे सरचिटणीस बी. एल. संतोष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची असेल. याबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे.