पणजी : चिंबल उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचले असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी दिली. सध्या रस्त्याचे हॉट मिक्सिंगचे काम सुरू असून उर्वरित काम येत्या आठवड्यात पूर्ण होईल.
फर्नांडिस यांनी सांगितले की, चिंबलवासीयांसाठी हा उड्डाणपूल दीर्घकाळापासूनची गरज होती. महामार्गावरील तीव्र उतारामुळे गेल्या अनेक वर्षांत अनेक अपघात झाले असून सुमारे २० जणांचा बळी गेला आहे.
उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भागातील सर्व्हिस रस्त्यामुळे प्रवाशांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. उड्डाण पूल कार्यान्वित झाल्यानंतर या समस्या सुटतील, असेही फर्नांडिस म्हणाले.