

डिचोली : प्रत्येकाने आपले आरोग्य चांगले ठेवावे. आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली असून आरोग्य निरोगी असेल तरच जीवन समृद्ध आहे. त्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिनी साखळी येथे आयोजित सेवा कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिबिरात केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या वाढदिनी विविध मंदिरांना भेट देऊन आशीर्वाद घेतले. तसेच गोमंतकीय जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आरोग्यासाठी प्रार्थना केली. साखळी भाजपतर्फे रवींद्र भवन येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भेट दिली व त्या ठिकाणी आलेल्या लोकांची विचारपूसही केली. आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या प्रती दुखवटा असल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे बुधवारी जाहीर केले होते. मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांनी साखळी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. केक, पुष्पगुच्छ आणले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यास नकार देत केवळ हस्तांदोलन करून शुभेच्छा स्वीकारल्या. मुख्यमंत्र्यांनी साखळीतील श्री दत्तात्रय मंदिर हरवळे व इतर मंदिरात भेट देऊन प्रार्थना केली.