

पणजी : राज्यातील विविध स्तरांतील मागास विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक अर्थसाह्य अधिक सुलभ रितीने मिळावे यासाठी सरकारच्या समाज कल्याण विभागातर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री शिष्यवृत्ती पोर्टल’चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते बुधवारी अनावरण करण्यात आले. यावेळी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, अर्थ खात्याचे प्रणव भट उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सरकारतर्फे राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची पारदर्शक आणि सुलभ पद्धत आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शिष्यवृत्ती प्रक्रिया गतिमान होणार असून, लाभार्थ्यांना थेट खात्यात निधी जमा होईल. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती आणि अल्पसंख्याक समाजातील पहिली ते दहावी (प्री-मॅट्रिक) आणि अकरावीपासून पुढे (पोस्ट-मॅट्रिक) शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनांसाठी पात्र आहेत. .
सुमारे 50 हजार विद्यार्थी या योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत. मंत्री फळदेसाई म्हणाले, या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. सर्व अर्ज प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पडेल आणि अर्जाचा दर्जा ट्रॅक करता येईल. हे पोर्टल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलप्रमाणेच कार्यान्वित करण्यात आले असून, राज्य शासनाच्या योजना या माध्यमातून अधिक व्यापकपणे आणि प्रभावीपणे राबवता येणार आहेत