

पणजी : राज्याच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) व्यवसायांचा मोठा वाटा आहे. या एमएसएमई क्षेत्राच्या विकासासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सरकारच्या उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खात्यातर्फे आयोजित जागतिक एमएसएमई दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, संचालक अश्विन चंद्रू, मांगिरीश पै रायकर, चेंबर्सच्या प्रतिमा धोंड उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, एकूणच उद्योग व्यवसायासाठी एमएसएमई हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर 90 टक्के व्यवसाय एमएसएमई आहेत. यातून 60 ते 70 टक्के रोजगार संधी निर्माण होते. एकूण जीडीपीमध्ये पन्नास टक्के वाटा या क्षेत्राचा आहे. राज्यात सुमारे 70 हजार जणांनी उद्यमी पोर्टलसाठी आपली नावनोंदणी केली आहे. हे राज्यासाठी भूषण आहे. या व्यवसायातून सुमारे 21 हजार कोटींची उलाढाल होते. हेही गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात सध्या 624 स्टार्टअप्स कार्यरत असून त्यातील सुमारे 50 टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली चालवली जात आहेत.
आमच्या सरकारने आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या. मात्र, आता केवळ आयटीपुरते मर्यादित न राहता, इतर क्षेत्रांतील स्टार्टअप्ससाठीही आम्ही लवकरच योजना विस्तार करत आहोत. गोव्यातील पारंपरिक कुणबी साडीचा उल्लेख करत सांगितले की, मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी या साडीचा वापर फारसा केला जात नव्हता. ती लोक विसरू लागले होते. मात्र, आम्ही या परंपरेला नवसंजीवनी दिली. ती पुन्हा समाजाच्या वापरामध्ये आली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिची दखल घेतली गेली. गोव्यातील स्थानिक परंपरा, हस्तकला आणि कापड उद्योगाला जर योग्य दिशा दिली, तर जागतिक बाजारपेठेतही गोव्यातील उत्पादनांची दखल घेतली जाऊ शकते.
आजच्या तरुणांनी केवळ सरकारी नोकर्यांच्या प्रतीक्षेत राहू नये. त्यांनी स्वतः उद्योगपती बनून सूक्ष्म, लघु किंवा मध्यम स्वरूपाचे उद्योग उभारावेत, असे आवाहन करत उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी आपल्याकडे प्रतिभावान तरुण आहेत. त्यांनी नोकरीऐवजी स्वतः नवे उद्योग निर्माण करावेत, जेणेकरून इतरांनाही रोजगार उपलब्ध होईल, असे म्हटले.