

मडगाव : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या २ आणि ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मडगाव येथील रवींद्र भवनात होणाऱ्या बीएलओ, ईएलसी आणि ईसीआयनेट या प्रादेशिक परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध व्यवस्थांचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीत प्रत्येक नोडल अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. परिषदेदरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विविध विभागांमधील समन्वय, कामांची सद्यस्थिती आणि उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
ही प्रादेशिक परिषद निवडणूक प्रक्रियेबाबत जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. विशेषतः युवक आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये निवडणूक साक्षरता निर्माण करणे, भारताच्या निवडणूक व्यवस्थेची माहिती देणे, मतदार नोंदणी, मतदान, मतमोजणी प्रक्रिया तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत जागरूकता निर्माण करणे हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. तसेच इलेक्टोरल लिटरसी क्लब्स अधिक सक्षम, दृश्यमान आणि ईसीआयनेट पोर्टलद्वारे डिजिटल स्वरूपात कार्यक्षम करण्यावर परिषदेत भर दिला जाणार आहे.
प्रोटोकॉल व्यवस्थापन, सुरक्षा, वाहतूक, पाहुण्यांच्या हालचाली आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या समन्वयाचा आढावाही घेण्यात आला. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून सोपविलेली कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करावीत, जेणेकरून प्रादेशिक परिषद यशस्वीरीत्या पार पडेल, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिल्या.