राजकीय लागेबांधे नाहीत

‘कॅश फॉर जॉब’प्रकरणी पोलिसांचा खुलासा; फसवणुकीचे 29 गुन्हे
Cash for Job' case
कॅश फॉर जॉब’ प्रकरणPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने पैसे घेतल्याप्रकरणी राज्यात आतापर्यंत 29 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 17 गुन्हे दक्षिण गोव्यात, तर 12 गुन्हे उत्तर गोव्यात नोंद झाले आहेत. तथापि, या नोकरी घोटाळ्यात अजूनपर्यंत तरी राजकारण्यांचे लागेबांधे दिसून आलेले नाहीत, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार, दक्षिण जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत व उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग, पोलिस उपअधीक्षक वर्षा शर्मा, पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता उपस्थित होते. पोलिस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक सुनीता सावंत व अक्षत कौशल यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले, आतापर्यंत ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात 33 जणांना अटक करण्यात आली आहे. 166 ग्रॅम सोने, 2 मिनी बस, 12 चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील आर्थिक व्यवहार टाळण्यासाठी अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या व्यवहारात रोख जाणि बँकेमार्फतही पैशांची देवाणघेवाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही जिल्ह्यांत मिळून आत्तापर्यंत 50 च्या आसपास पीडितांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. ही प्रकरणे 2014 ते 2015 च्या काळातील असून कोविड आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमुळे नोकर भरती होऊ न शकल्यामुळेच ही प्रकरणे उघडकीस आली आहेत. दक्षिण जिल्ह्यात संशयितांनी फसवणूक केलेल्या रकमेचा आकडा 5 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिली. तर उत्तर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी आकडेवारी देण्यास असमर्थता दर्शविली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

घोटाळ्याचे प्रकार 2014-15 मध्ये घडले, मात्र तक्रार देण्यास पीडितांना दहा वर्षे का लागली या प्रश्नावर अलोक कुमार यांनी सांगितले की, एक फसवणूक प्रकरण पुढे आल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशाप्रकारे फसवणूक कुणाची झाली असेल तर त्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. त्यामुळे अनेकांनी तक्रारी दाखल केल्या.

दीपश्रीला 14, श्रुतीला 6 दिवसांची पोलिस कोठडी

पणजी/फोंडा : राज्यात सध्या गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब प्रकरणात फोंडा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दीपश्री सावंत-गावस हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर श्रुती प्रभुदेसाई हिला 6 तसेच योगेश शेणवी कुंकळ्येकर याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिघांनाही शनिवारी फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांसमोर उभे केले असता वरीलप्रमाणे कोठडी सुनावण्यात आली.

फोंडा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दीपश्रीला अटक करण्यासाठी म्हार्दोळ पोलिसांनी तयारी केली होती मात्र ही अटक आता 14 दिवसानंतर होण्याची शक्यता आहे. माशेलकर येथील संदीप परब याच्या तक्रारीनुसार ही अटक होणार होती.

फोंडा पोलिस सध्या कसून तपास करीत असले तरी पैशांची देवाणघेवाण झाल्याचे एक प्रकरण उघडकीस आल्यानंतर इतर कोणत्याही प्रकरणांत थेट पुरावा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फक्त उसगाव येथील एका महिलेने कुर्टी-फोंडा येथील सागर नाईक याच्याशी बँकेमार्फत व्यवहार केला होता मात्र इतर रकमेची देवघेव रोखीने झाली होती.

रोख व्यवहार झाल्यामुळे पोलिसांना आता परिस्थितीजन्य पुराव्यावर विसंबून रहावे लागणार आहे. त्यासाठी संबंधितांचे कॉल डिटेल्स व इतर व्यवहारांंचे पुरावे गोळा करावे लागणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दीपश्रीच्या मध्यस्थाची भूमिका बजावणार्‍या माशेल येथील संदीप परब याने दीपश्रीच्याच विरोधात म्हार्दोळ पोलिसांत तक्रार नोंदवली होती. यातून दीपश्रीने सरकारी नोकर्‍यांचे आमिष दाखवून तब्बल 44 जणांना सुमारे 4 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली होती.

सरकारी नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवून अनेकांना सुमारे 1.21 कोटींना गंडा घातल्या प्रकरणी मुख्य संशयित श्रुती प्रभूगावकर या पर्वरी येथील महिलेला न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news