

मडगाव : स्थानिक टॅक्सी मालक आणि खासगी टॅक्सी अॅग्रीगेटर चालकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. उबेर टॅक्सी अॅग्रीगेटर्सना गोव्यात सेवा देण्यास बंदी असतानाही मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाणावली येथे सेवा दिल्याचा प्रकार उघड झाला असून, त्यामुळे स्थानिक आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी उबेरची सेवा देणार्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे सविस्तर वृत्त असे की, बाणावलीतील स्थानिक टॅक्सीचालकांनी गुरुवारी रात्री उशिरा उबेरच्या टॅक्सीचालकाला पकडून कारवाईसाठी कोलवा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सहायक वाहतूक संचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार देवेंद्र सातार्डेकर चालक व उबेर व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातार्डेकर हा वास्को येथील रहिवासी असून, त्याने मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून उबेरचे अॅप डाउनलोड केले होते. या अॅपच्या माध्यमातून टॅक्सीचालक मोप विमानतळ व दाबोळी विमानतळावरुन बाणावलीतील भाडे घेत होता. गुरुवारी रात्री मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सातार्डेकर हा भाडे घेऊन बाणावलीत आला असता, स्थानिक टॅक्सीचालकांनी त्याला विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी सदर टॅक्सीचालकाला कोलवा पोलिसांच्या ताब्यात देत तक्रार दाखल केली. यावेळी आमदार व्हेन्झी व्हिएगस व सामाजिक कार्यकर्ते वॉरेन आलेमाव यांच्यासह टॅक्सीचालकांनी पोलिस ठाण्यावर गर्दी केली होती.
वॉरन आलेमाव यांनी सदर कारचालक बेकायदा अॅपव्दारे उबेरची सेवा देत असताना आढळला आहे. हा प्रकार म्हणजे राज्याच्या वाहतूक धोरणाची अवहेलना आहे. त्यामुळे त्याची कार जप्त करण्यात यावी व त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. अशाप्रकारचे बेकायदा अॅप सरकारने बंद करावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
आमदार व्हेंझी व्हिएगस म्हणाले, राज्यात अद्याप ओला व उबेरची सेवा अद्याप सुरू झालेली नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच नमूद केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी हीच भूमिका विधानसभेतही मांडली आहे. असे असतानाही बेकायदा व्यवसाय सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे. हे प्रकार वेळीच रोखण्यासाठी संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.