

पणजी : बांबोळी-शिरदोण येथील प्रसिद्ध फुलांचो खुरीस परिसरात शनिवारी पहाटे कारने पेट घेतल्याने एकाचा जळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती प्रथम महामार्गावरील बॅरिकेडवर आदळली आणि त्यानंतर थेट खाली सेवा रस्त्यावर कोसळली. त्याचवेळी कारने पेट घेतल्याने चालक यश मेहता यांचा गाडीतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
हरीश जैन आणि तनिष पुरी हे गंभीर जखमी अवस्थेत कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. कार पणजीहून मडगावच्या दिशेने जात होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचा वेग अत्यंत जास्त होता. फुलांचो खुरीसजवळ पोहोचताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने महामार्गावरील सुरक्षेसाठी उभारलेल्या बॅरिकेडला जोरदार धडक दिली. धडक इतकी मोठी होती की, कार हवेत उडून सेवा रस्त्यावर आदळली. त्याच क्षणी इंजिनमधून मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती पहाटे ४ वाजता मिळताच पणजी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत चालकाचा मृत्यू झाला होता. आगशी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून चालकाला डुलकी लागली होती की, अतिवेगामुळे नियंत्रण सुटले, याचा तपास सुरू आहे.