पणजी : कर्नाटकातील मंगळूर-बंगळूर महामार्गावरील मंड्या येथे कार व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात आल्तो पर्वरी येथे राहणार्या रोस व डॅरील वाझ या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर कारचालक नॅथन वाझ व नील फारिया हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पर्वरीहून कोईंबतूरला जात असताना बुधवारी (दि. 20) रात्री उशिरा झाला.
बंगळूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझ यांची कार मंगळूर-बंगळूर महामार्गावरील मंड्या येथे पोहोचल्यानंतर समोरून येणार्या ट्रकने कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. रोस व डॅरील दोघेही डाव्या बाजूला बसले होते. या धडकेत ते जागीच ठार झाले. कारचालक नॅथन हा डॅरील वाझ यांचा मुलगा आहे. तर जखमी नील फारीया हे म्हापसा येथील उद्योजक आहेत. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.