

वास्को/दाबोळी : सांकवाळ-झुआरीनगर येथील बिटस् पिलानी गोवा कॅम्पसमध्ये गेल्या 16 ऑगस्ट 2025 ला मृतावस्थेत सापडलेल्या कुशाग्र जैन (वय 20) यांच्या मृत्यूच्या चर्चेला पूर्णविराम बसण्यापूर्वी गुरुवारी (दि. 4) आणखी एक वीसवर्षीय विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. गेल्या 20 दिवसांतील ही दुसरी घटना आहे. मृतावस्थेत सापडलेल्या विद्यार्थ्याचे नाव ऋषी नायर (वय 20) असे आहे. दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांत बिटस् पिलानी गोवा कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नायर याच्या मृत्यूप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
गेल्या 16 ऑगस्टला मृतावस्थेत सापडलेला कुशाग्र जैन याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी व्यवस्थापनाने निरनिराळे उपाय हाती घेतले आहेत. तरीही गुरुवारी ऋषी नायर हा कॅम्पसमध्ये मृतावस्थेत सापडल्याने सदर कॅम्पस पुन्हा चर्चेत आले आहे.
ऋषी नायर हा गेल्या महिन्यातच या कॅम्पसमध्ये आला होता. यापूर्वी तो हैद्राबाद येथील बिटस् पिलानी कॅम्पसमध्ये होता. तेथे वैयक्तिक कारणास्तव त्याला नैराश्य आल्याने तो तणावाखाली होता. त्यामुळे त्याला तेथून गोवा कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यात आला होता. येथेही तो तणावाखाली असल्याचे समजते. या तणावाखालीच त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऋषीचा मृतदेह ज्या ठिकाणी होता, तेथे त्याने उलट्या केल्याचे पोलिसांना आढळले. ऋषीने सकाळपासून आपल्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने, अखेर दरवाजा तोडण्यात आला. यावेळी ऋषी खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. बिटस् पिलानीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी वेर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
पोलिसांनी ऋषीच्या मृत्यूचा पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पाठविला आहे. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर कळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी ओम प्रियान सिंग याने डिसेंबर 2024 मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर मार्च 2025 मध्ये अथर्व देसाई याच्या आत्महत्येने कॅम्पस हादरले होते. त्यानंतर दोन महिन्यानंतर म्हणजे मे 2025 मध्ये कृष्णा कासेरा याने आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या कुटुंबाने काही आरोप केले होते. ऑगस्ट 2025 मध्ये कुशाग्र जैन हा हॉस्टेलच्या खोलीत मृतावस्थेत सापडला होता.
ओम प्रियान सिंग डिसेंबर 2024
अथर्व देसाई मार्च 2025
कृष्णा कासेरा मे 2025
कुशाग्र जैन ऑगस्ट 2025
ऋषी नायर सप्टेंबर 2025
बिटस् पिलानी येथे विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त केली आहे. अशा घटनांची चौकशी ही समिती करेल आणि समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. शिक्षण संस्थांना नियमावली दिली गेलेली आहे. त्या नियमावलीत आणखी कडक नियम घातले जातील. जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली समिती मागील घटनांचीही चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कुशाग्र जैन आत्महत्याप्रकरणी तत्कालीन राज्यपाल पिल्लाई यांनी दखल घेताना संपूर्ण अहवाल मागितला होता. विद्यार्थ्यांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये यासाठी बिटस् पिलानी व्यवस्थापन मंडळाने निरनिराळ्या उपाययोजना हाती घेतल्या होत्या. निरनिराळ्या सूचनांचा त्यांनी स्वीकार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानंतरही या कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले.