

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
उडुपी (कर्नाटक) येथील वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक संदीप सलायम मालपे (४२) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अक्षता एम. के. उर्फ रुपाश्री सी. (३५, रा. बेंगळुरू) हिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
३० जून रोजी कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये संदीप मालपे यांचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलेचा मृत्यूप्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी १ जुलै रोजी कर्नाटक पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला.
बेंगळुरू येथे लपून बसलेल्या संशयित महिलेला ३ जुलै रोजी अटक करून गोव्यात आणण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कालावधीत संदीप मालपे यांचा मृत्यू गुंगीचे औषध दिल्यामुळे झाला का, तसेच मृत्यूपूर्वी नेमका घटनाक्रम काय घडला, याचा तपास पोलीस करणार आहेत. या चौकशीतून मृत्यूमागील कारणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.