

पणजी : मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत फोंडा विधानसभेची पोटनिवडणूक झाल्यानंतरच विचार केला जाईल. त्यापूर्वी मंत्रिमंडळात कोणतेच बदल होणार नाहीत किंवा कुणाला संधी दिली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान, पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना दिवंगत रवी नाईक यांच्या रिक्त जागी नवी मंत्री केव्हा घेणार, असा प्रश्न केला असता त्यांनी फोंडा पोटनिवडणुकीनंतरच त्यावर विचार होईल, असे सांगितले.
फोंड्याचे माजी आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे मंत्रिमंडळातील एक स्थान रिक्त झालेले आहे. त्यामुळे या जागी कुणाला संधी मिळणार यावर राज्यभर चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो व मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनुक्रमे गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी) व गोवा मलनिस्सारण विकास महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. लोबो व आमोणकर यांनी ती नियुक्ती नाकारलेली नाही, त्यामुळे मंत्रिपदापासून हे दोन्ही आमदार बाजुला झालेले आहेत. त्यामुळे रिक्त मंत्रिपदावर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल किंवा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मते, जोपर्यंत फोंडा पोटनिवडणूक होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही.
2022 मध्ये भाजपने सरकार स्थापन केले तेव्हा फोंडा तालुक्यातील चारही आमदारांना मंत्री करावे लागले होते. कारण रवी नाईक (फोंडा), सुभाष शिरोडकर (शिरोडा) हे ज्येष्ठ नेते होते, सुदिन ढवळीकर (मडकई) यांना युती पक्ष मगोचे ज्येष्ठ नेते म्हणून संधी मिळाली होती तर गोविंद गावडे (प्रियोळ) हे आदिवासी एसटी समाजाचे नेते म्हणून त्यांनाही मंत्री करावे लागले होते. कारण त्यावेळी रमेश तवडकर यांना सभापतिपद देण्यात आले होते. एका तालुक्यात चार मंत्री केले म्हणून इतर आमदार नाराज होते. काही महिन्यांपूर्वी तवडकर यांना मंत्री करण्यासाठी गोविंद गावडे यांना वगळले गेले आणि रवी नाईक यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे आता फोंडा तालुक्यात दोनच मंत्री राहिले आहेत. कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात एक जागा रिक्त आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये भाजपमध्ये सामील झालेल्या आठ आमदारांत लोबो आणि आमोणकर यांचा समावेश होता. सध्या आठपैकी फक्त दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. आलेक्स सिक्वेरा यांना सुरुवातीला मंत्रिपद देण्यात आले होते मात्र आजारपणामुळे त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.
जि.पं. निवडणुकीनंतरच फोंड्याची पोटनिवडणूक
राज्यातील जिल्हा पंचायतीची निवडणूक 13 डिसेंबर रोजी जाहीर झालेली आहे. त्यामुळे ही निवडणूक होऊन मतमोजणी झाल्यानंतरच फोंडा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.