

पणजी : राज्यातील एकमेव प्राणी संग्रहालय व अभयारण्य असलेले बोंडला अभयारण्य तब्बल 85 दिवसांनंतर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. या अभयारण्यात काही दिवसांपूर्वी इन्फल्युंझामुळे 3 रानमांजरे आणि 2 उदमांजरांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे अभयारण्य बंद ठेवण्यात आले होते. मात्र भूपाळच्या एनआयएचएसएडी प्रयोगशाळांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने हे अभयारण्य सुरू करण्यात आले. गुरुवारी पहिल्याच दिवशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 52 देशी आणि 2 विदेशी पर्यटकांनी या परिसराचा आनंद घेतला.
वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने पाठवलेल्या रक्ताच्या नमुन्यात कोणताही संसर्गजन्य आजार न आढळल्यामुळे मोठ्या काळजीपूर्वक तपासणीनंतर अभयारण्य पुन्हा सुरू करण्यात आले. राज्यातील पर्यावरण पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग असलेले बोंडला अभयारण्य हे स्थानिकांसह देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे प्राणी निरीक्षण, निसर्गप्रेमींसाठी विविध वनस्पती प्रजाती आणि रम्य वातावरण आहे. या प्राणी संग्रहालयात गवे, बिबटे, चितळ, सांबर, कोल्हे, अस्वल, रानमांजरे, विविध जातीचे साप आणि पक्षीही आहेत. यातीलच काही रानमांजरांना फ्ल्यूची लागण झाली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे 1 एप्रिलपासून हे प्राणीसंग्रहालय बंद होते.
पर्यटकांनी अभयारण्यात नियमांचे पालन करावे, प्राण्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच परिसराची स्वच्छता राखावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. बोंडला अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होणार असल्याने पर्यटन क्षेत्रास नवसंजीवनी मिळणार असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निसर्ग पर्यटनाची गती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.