

म्हापसा पुढारी वृत्तसेवा
श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवाच्या फेरीतून यंदा म्हापसा पालिकेने सोपो आणि कचरा कराच्या स्वरूपात सुमारे २२.१२ लाख रुपांचा महसूल प्राप्त केला आहे. यंदा १ जानेवारी ते १२ जानेवारी अशी १२ दिवस जत्रोत्सवाची फेरी मंदिराच्या आवारात होती. गेल्यावर्षी १६ दिवस जत्रेची फेरी ठेवण्यात आली होती. गेल्यावर्षी पेक्षा यंदा ४८ हजार रुपये कमी महसूल मिळाला असून मागील वर्षी हा आकडा २२.६० लाख रुपये होता. श्री देव बोडगेश्वर यांच्या वार्षिक जत्रेत मंदिराच्या आवारात उभारलेल्या फेरीमध्ये शकडोच्या संख्येने दुकाने थाटली जात होती. यंदा बर्च क्लब दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने अग्निसुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी केल्यामुळे दुकानांची संख्या कमी करण्यासह अग्निशमन दलाच्या वाहनाला आवश्यक वाट ठेवण्यात आली होती. यंदा प्रत्यक्षात जत्रोत्सव १ ते ८ जानेवारी असा आठ दिवशीय होता. तर त्यानंतर पुढील चार दिवस १२ जानेवारीपर्यंत फेरी ठेवण्याची अनुमती देवस्थान समिती तसेच म्हापसा नगरपालिकेने दिली होती. पालिकेनेनया भव्य जत्रोत्सवातील फेरीतून प्रति रनिंग मीटर दरानुसार स्टॉल्स तसेच इतर विक्रेत्यांकडून एकूण १९.७२ लाख रुपये रकमेचा महसूल गोळा केला आहे. तर जायंट व्हील आणि इतर राईड्सकडून २.४० लाख रुपये महसूल वसूल करण्यात आला. हा एकूण २२.१२ लाख रुपये महसूल जत्रेतून पालिकेला मिळाला आहे. या व्यतरिक्त बोडगेश्वर मैदानावर सुरू असलेल्या सर्कसकडूनही पालिकेला यंदा महसूल प्राप्त होणार आहे. हा महसूल गोळा करण्यासाठी पालिकेने वसुली पथकाची नियुक्ती ज्ञानेश्वर पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली केली होती. या पथकामध्ये वरिष्ठ कारकून नीलेश लिंगुडकर प्रकाश कांबळे, संदीप कांबळे, नागाप्पा पुजारी, चिन्नाप्पा होल्लेप्पनवर, अर्जुन गावस व आयुश विर्डीकर यांचा समावेश होता. बोडगेश्वर जत्रेतील कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट लावण्याचे काम यंदा पालिकेने प्रथमच आऊटसोर्स केले होते. हे अंदाजे ५ लाख रुपयांचे कंत्राट असून दर दिवशी जत्रेच्या फेरीतील कचरा गोळा करणे व नंतर त्याची कचरा प्रकल्पामार्फत विल्हेवाट लावणे असे हे काम होते.
कंत्राटदाराकडूनच कचरा सफाई : नगराध्यक्ष
यावर्षी पालिकेच्या महसूल वसुली पथकाने उत्तम कामगिरी बजावत देव बोडगेश्वर जत्रेतून मोठ्या प्रमाणात महसूल जमा केला आहे. जत्रेतील कचरा उकल करण्यासाठी कंत्राटाची नियुक्ती पालिकेने केली होती. सदर कंत्राटदारामार्फतच फेरी हटवल्यानंतर निर्माण होणारा कचरा काढला जाईल. यामुळे पालिका कामगारांवर हा कचरा संकलनाचा अतिभार पडणार नाही, असे नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी सांगितले.