डिचोली : गृहनिर्माण वसाहतीत प्लॉट देण्याच्या बहाण्याने एका द़ृष्टिहीन मुलीची फसवणूक करण्याचा प्रकार मानवतेला काळिमा फासणारा आहे. अशा वृत्तीला ठेचून काढण्यासाठी सरकार कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमावेळी दिली.
प्लॉट देण्याच्या बहाण्याने खोटी कागदपत्रे तयार करून 8 लाख रुपये घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हा विभागाने संशयित सादिक शेख (रा. पणजी) याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. या संदर्भात फसवणूक झालेली युवती सुमेरा खान आपल्याला भेटायला आली होती. या संदर्भात गुन्हा शाखा पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लोकांनी पूर्ण सावध राहावे तसेच तक्रारी दाखल कराव्यात. कुणाचीही गय केली जाणार नाही. फसवणूक प्रकरणात सरकारी कर्मचारी, अधिकारी सहभागी असल्याचे आढळ्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.