Black Panther Goa news | गोवा-महाराष्ट्राच्या कॉरिडॉरमध्ये ब्लॅक पँथरचे वास्तव्य

सिंधुदुर्गातील झोळंबेसह गोव्यात वावर; दुर्मीळ होतेय प्रजात
Black Panther Goa news | गोवा-महाराष्ट्राच्या कॉरिडॉरमध्ये ब्लॅक पँथरचे वास्तव्य
Published on
Updated on

प्रभाकर धुरी

पणजी : गोवा-महाराष्ट्र जोडणाऱ्या पश्चिम घाटातील कॉरिडॉरमध्ये ब्लॅक पँथरचे दर्शन घडत आहे. या परिसरात वाघांच्या वावरही आढळला आहे. त्यानंतर आता गोवा -महाराष्ट्र सीमेवरील झोळंबे (दोडामार्ग, सिंधुदुर्ग) गावात अनेकांना ब्लॅक पँथरचे दर्शन घडले आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये, भैरवगड ते रांगणागड या १५-२० किमी सह्याद्रीच्या पट्ट्यात ब्लॅक पँथर आढळले आहेत.

आंबोली, तिळारी परिसर आणि गोव्यातही ब्लॅक पँथरचे दर्शन अनेकांना घडले आहे. हा सगळा भाग वाघांसह ब्लॅक पँथरचा कॉरिडॉर मानला जातो. दुर्मीळ समजला जाणारा ब्लॅक पँथर बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगलातील प्राण्यांची संख्या कमी झाल्याने लोकवस्तीत भक्ष्यासाठी येत आहेत. मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांना ते लक्ष्य करीत आहेत. बिबट्याच्या प्रवर्गातील दुर्मीळ असलेला ब्लॅक पँथर (काळा बिबट्या, जग्वार) गोव्यातही अनेकदा दिसला होता. गोव्यातील नेत्रावळी अभयारण्यात त्याचा वावर असायचा.

धारबांदोड्यात एका ब्लॅक पँथरने पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याने दहशत पसरली होती. नंतर तो वनविभागाच्या सापळ्यात सापडला होता. तसेच, गेल्यावर्षी (२०२५) फोंडा तालुक्यातील कोने-प्रियोळ मार्गावर एका ब्लॅक पँथरचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नेत्रावळी वन्यजीव अभयारण्यात २०२० मध्ये ब्लॅक पँथर कॅमेऱ्यात कैद झाला होता. २०२३ मध्ये धारबांदोड्यातील बाळ्ळी भागात ब्लॅक पँथरचा वावर वाढला होता, त्याने कुत्र्यांसारख्या प्राण्यांची शिकार केली होती. अखेर वनविभागाने त्याला सापळ्यात पकडले होते.

वनविभागाने नोंद घेण्याची मागणी

झोळंबे येथे मोठ्या प्रमाणावर खनिज साठे आहेत. गोव्यातील अनेक व्यावसायिक खनिजाचे लिज मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, खनिज प्रकल्पाच्या पर्यावरण आघात अहवालात त्या भागात वाघ, ब्लॅक पँथर व अन्य वन्य प्राणी असल्याची नोंद नव्हती. मात्र, वन विभागाने ती नोंद आता तरी आपल्या दप्तरी करावी, अशी मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

स्थानिकांत भीती पर्यावरणवाद्यांकडून समाधान

ब्लॅक पँथर आढळणे हे विपुल वनसंपदा आणि समृद्ध जैवविविधता असल्याचे द्योतक आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्यातील जंगल परिसर समृद्ध असल्यानेच तो आढळत आहे. तथापि, ब्लॅक पँथर कधी कधी लोकवस्तीत येत असल्याने लोकांमध्ये भीती असते. मात्र, ब्लॅक पँथरचे अस्तित्व आढळत असल्याने पर्यावरणवादी समाधान व्यक्त करत आहेत.

...म्हणून दिसतो पँथर ब्लॅक

ब्लॅक पँथर हा त्वचेतील मेलनिनच्या अधिक प्रमाणामुळे काळ्या रंगाचा दिसतो. ब्लॅक पँथर भारत, आशिया आणि अमेरिकेत आढळतात. भारतात सह्याद्री, त्रावणकोर, दक्षिण भारत आणि म्यानमारमध्ये ब्लॅक पँथर आढळतात. पश्चिम घाटातील घनदाट जंगलात अगदी सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत त्यांचा वावर आढळतो

झोळंबेत अनेकांना ब्लॅक पँथरचे दर्शन

गोवा सीमेवरील झोळंबेत अनेकांना ब्लॅक पँथरचे दर्शन झाले आहे. गेल्या १५ दिवसांत अनेकदा तो दिसला आहे. शिवाय त्याने त्या परिसरातील ३ पाळीव कुत्रेही लोकवस्तीत येऊन पळवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news