

फोंडा : कोने-प्रियोळ येथे मुख्य रस्त्याशेजारी वाहनाच्या धडकेत एका ब्लॅक पँथरचा मृत्यू होण्याची दुर्घटना शनिवारी मध्यरात्री घडली. म्हार्दोळ पोलिस ब्लॅक पँथरला धडक देऊन पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध घेत आहेत.
अपघातात सापडून मृत झालेला ब्लॅक पँथर दुर्मीळ असून ही मादी मरण पावल्याने वनमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ब्लॅक पँथरच्या दुर्दैवी मृत्युबद्दल वनमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले असून, यासंबंधीचा पूर्ण अहवाल देण्यासह पळून गेलेल्या वाहन चालकाचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
शनिवारी मध्यरात्री या मार्गावरून वाहतूक करणार्यांच्या नजरेस हा ब्लॅक पँथर जखमी अवस्थेत रस्त्याकडेला पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी म्हार्दोळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वन खात्याच्या अधिकार्यांना याची माहिती दिली. त्यानंतर वन खात्याचे अधिकार्यांनी वन्य मित्रांच्या व पोलिसांच्या मदतीने जखमी पँथरला पिंजर्यात घालून फोंडा वन खात्याच्या कार्यालयात आणले. पण तोपर्यंत जखमी ब्लॅक पँथर मृत झाला होता. ब्लॅक पँथरची शवचिकित्सा करण्यात येत असून याबाबतचा अहवाल तयार केला जाईल, अशी माहिती वन खात्याच्या अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, घटनास्थळी पोचलेल्या प्रियोळ येथील उमेश गावडे यांनी वन खात्याला अनेकांनी फोन करण्याचा प्रयत्न केला पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. ब्लॅक पँथर ही बिबट्यांची दुर्मिळ जात असून ती वाचली पाहिजे, असे गावडे म्हणाले. प्राणीमित्र चरण देसाई व इतरांनीही जखमी बिबट्याला जीवदान देण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशस्वी ठरला. या प्रकरणी बोलताना चरण देसाई यांनी रात्रीच्यावेळी जखमी जनावरांवर उपचार करण्यासाठी वन खात्याने विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करून नपेक्षा स्वयंसेवी प्राणिमित्र संस्था संघटनांना तशी परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
कोने-प्रियोळ येथील अपघातात मृत पावलेला ब्लॅक पँथर तीन वर्षांची पूर्ण वाढ झालेली मादी असल्याची माहिती वन खात्यातर्फे देण्यात आली. प्रियोळ भागातील डोंगरावर या मादी पँथरचा वावर असावा आणि रात्रीच्यावेळी रस्ता पार करताना एखाद्या ट्रक किंवा अवजड वाहनाने धडक दिली असावी, अशी माहिती पोलिस आणि वन खात्याच्या अधिकार्यांनी दिली.
जखमी अवस्थेत ब्लॅक पँथर उठण्याचा प्रयत्न करीत होती पण ते तिला शक्य होत नव्हते. वन खात्याच्या कर्मचार्यांनी जाळ्यात टाकून तिला पिंजर्यात बंद केले. डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून रक्तस्राव होत होता. मात्र पिंजर्यात सोडल्यावर ही ब्लॅक पँथर उठून उभी राहिली आणि नंतर कोसळली. गंभीर जखमी झाल्यामुळे नंतर ही मादी ब्लॅक पँथर मरण पावली.
जखमी ब्लॅक पँथरची माहिती देण्यासाठी वन खात्याला अनेकांनी फोन केले पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. शेवटी म्हार्दोळ पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी वन खात्याशी संपर्क साधला त्यानंतर वन खात्याचे कर्मचारी तासाभराने पोचले.