

पणजी : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनानंतर लगेच मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळी विधानसभा अधिवेशनात भाजपचे मंत्री व आमदार कशी कामगिरी करतात याकडे प्रदेश कार्यकारिणीचे लक्ष असणार आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही याला दुजोरा दिला आहे. भाजपच्या प्रत्येक मंत्री आमदाराने जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडले पाहिजेत व ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचना नाईक यांनी पणजीत झालेल्या भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत केल्याचे कळते.
पणजी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, आमदार दिगंबर कामत, नीलेश काब्राल, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता खोलकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, खजिनदार संजीव देसाई, गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर नाईक म्हणाले, भाजपला विधानसभेत बहुमत आहे. 40 पैकी 33 आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. निवडणुकीत कोणाशी युती करावी की नाही याचा निर्णय गाभा समिती व पक्षाचे वरिष्ठ नेते योग्यवेळी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दामू नाईक यांनी भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांशी नुकतीच पक्ष मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि सर्वानंद भगत यांची उपस्थित होती. या बैठकीत जिल्हा पंचायत सदस्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.