'हरियाणातील भाजपचे यश महाराष्ट्रामध्ये टॉनिक ठरणार'

गोवा भाजपचे अध्यक्ष खासदार तानावडे यांची प्रतिक्रिया
BJP's success in Haryana will be a tonic in Maharashtra: MP Tanavade
'हरियाणातील भाजपचे यश महाराष्ट्रामध्ये टॉनिक ठरणार'File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हरियाणामध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने जातीय प्रचार केला, भाजपचा केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रचारही केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेला विकास आणि हरियाणातील भाजपच्या सरकारचे काम तथा एकूणच विकास पाहून हरियाणातील जनतेने भाजपला सलग तिसऱ्यांदा बहुमत दिले आहे. हरियाणातील हा विजय येत्या काळामध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी टॉनिक ठरेल आणि तेथेही महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे गोवा राज्य अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला.

आज (मंगळवार) हरियाना आणि जम्मू-काश्‍मीर येथील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पणजी येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तानावडे बोलत होते. भाजपने कधीही जातीचे, धर्माचे राजकारण केले नाही. विकास हेच ध्येय ठेऊन भारतातील प्रत्येक नागरिकाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने मात्र नेहमीच जातीय राजकारण, मताचे राजकारण करून आणि अपप्रचार करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हरियाणातील जनता काँग्रेसच्या अपप्रचाराला भुलली नाही. त्यांनी भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता दिली. महाराष्ट्रातही महाआघाडीचे नेते वेगवेगळ्या प्रकारे अपप्रचार करत आहेत, जातीचे, धर्माचे राजकारण करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न महाराष्ट्रातील मतदार यशस्वी होऊ देणार नाहीत आणि महायुतीला पुन्हा एकदा सत्ता देतील असे तानावडे म्हणाले.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला सत्ता मिळावी ईतके काम तेथे केंद्र सरकारने केले आहे. मात्र तेथील राजकारण हे वेगळे आहे. तेथे अद्यापही नागरिकांमध्ये तेथील स्थानिक पक्षांचा पगडा आहे. तेथे काँग्रेसला अवघ्या सहा जागा मिळालेल्‍या आहेत. तर भाजपला 29 जागा मिळालेल्या आहेत. मात्र काँग्रेस पराभूत होऊन लोकसभेमध्ये जसे 99 जागा मिळून विजय साजरा करत होता. तसाच आताही जम्मू-काश्मीर बाबत 6 जागा मिळवून आनंद व्यक्त करत आहे. काँग्रेसची स्थिती देशभरात चिंताजनक आहे. असे तानावडे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news