

पणजी : भारतीय जनता पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 9 उमेदवारांचा समावेश असून त्यामध्ये महेश सावंत हे एकमेव विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य आहेत. तर सहकार खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांची मुलगी डॉ. गौरी शिरोडकर यांना शिरोडामधून जि. पं.साठी उमेदवारी देण्यात आली आहे.
आतापर्यंत भाजपने पहिल्या टप्प्यामध्ये 19, दुसर्या टप्प्यामध्ये 10 आणि तिसर्या टप्प्यात 9 अशा एकूण 38 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी मगो पक्षाला तीन जागा व दोन अपक्ष आमदारांना प्रत्येकी एक जागा अशा पाच जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या पाच जागा वगळता भाजप 50 पैकी 45 जागा लढवणार आहे. आतापर्यंत 38 उमेदवार जाहीर करण्यात आले असून उर्वरीत 7 उमेदवारांची नावे भाजप लवकरच घोषित करणार आहे.
भाजपने घोषित केलेल्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नाईक हे स्वतः अनेक उमेदवारांच्या प्रचार कार्यामध्ये सहभागी होत आहेत. खोर्ली जिल्हा पंचायतीचे उमेदवार सिद्धेश नाईक यांच्या प्रचाराला बुधवारी माशेल येथून सुरुवात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई उपस्थित होते.
गुरुवारी अर्ज भरणार
आज फेस्ताची सुट्टी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. उद्या गुरुवारी दत्तजतंयी असून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत.
1 डिसेंबरपासून उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे.
9 डिसेंबर ही उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
केव्हाही उमेदवार जाहीर करू : परब
आरजी पक्षामध्ये उमेदवारी घोषित करण्याबाबत अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे या पक्षाने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. आपल्या पक्षाचे उमेदवार तयार आहेत ते केव्हाही आम्ही घोषित करू शकतो अशी प्रतिक्रिया आरजी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी दिली आहे. काँँग्रेस पक्षाने 11 उमेदवार जाहीर केले आहेत.
बुधवारी जाहीर झालेले उमेदवार
धारगळ (खुला) : श्रीकृष्ण (नानू) रवींद्र हरमलकर, तोर्से (ओबीसी) : राघोबा लाडू कांबळी, सांताक्रुझ (ओबीसी महिला) : सोनिया विदेश नाईक, कारापूर-सर्वण (खुला) : महेश अनंत सावंत, मये चोडण (महिला) : कुंदा विष्णू मांद्रेकर, बोरी (महिला) : पूनम चंद्रकात सामंत, शिरोडा (महिला) : डॉ. गौरी सुभाष शिरोडकर, गिर्दोली (एसटी) : गोकुळदास महादेव गांवकर, खोला (ओबीसी महिला) : तेजल अजय पागी.