

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात व केंद्रात असलेल्या भाजपच्या डबल इंजिन सरकारने देश व गोव्याचा भरीव विकास केलेला आहे. या विकासाच्या जोरावरच २०२७ मध्ये भाजप राज्यात २७ पेक्षा जास्त जागा जिंकेल, त्यासाठी भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्याच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्यात व आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी येथील गोमंतक मराठा सभागृहात बुधवारी आयोजित भाजपच्या सक्रिय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधीत करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दाम नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार रुडाल्फ फर्नांडिस,
आमदार प्रेमेंद्र शेट, राजेश फळदेसाई, दिलायला लोबो, महिला अध्यक्ष आरती बांदोडकर आणि इतर नेते व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देशाचा, समाजाचा विचार करण्याचे शिक्षण भाजपच्या नेत्यांना मिळते आणि तोच विचार पुढे घेऊन राजकारणात यश मिळवले जाते.
४० ही जागा लढवणार, ५२ टक्के मते घेणार.. मेळाव्याला ९६ टक्के कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. पूर्वी भाजपचा सदस्य होण्यासही कोणी तयार होत नव्हते, आता सदस्य होण्यासाठी लोक पुढे येत आहेत. जे जुने कार्यकर्ते होते व पक्षाच्या कामापासून दूर होते तेही आता पक्षात येत आहेत.
भाजपची मते मागील विधानसभा निवडणुकीवेळी ३३ टक्के होती. आता ती ५२ टक्के करायची आहेत. आणि त्यासाठी पक्ष सर्व ४० ही जागा लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. तानावडे व इतर नेत्यांची भाषणे झाली. सूत्रनिवेदन रुपेश कामत यांनी केले. भाजपमध्ये कार्यकर्ते महत्त्वाचे... मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाचा भरीव विकास केल्यामुळे व गोवा सरकारलाही त्याचा लाभमिळाल्याने अनेक नवे प्रकल्प गोव्यात उभे राहिले. अनेक योजनांचा लाभमिळत आहे.
केंद्र व राज्याचे विकासाचे काम लोकांना पुन्हा पुन्हा सांगून भाजपची मते वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पंतप्रधानाचा उमेदवार, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार व प्रत्यक्ष त्या मतदारसंघाचा उमेदवार यांना पाहून लोक मते देत असली तरी उमेदवार विजयी होण्यासाठीची मते ही कार्यकर्त्यांमुळे मिळतात.
त्यामुळे भाजपमध्ये कार्यकर्ते महत्त्वाचे असून तेच पक्षाचे नेते ठरतात. सरकारच्या चांगल्या कामांचा प्रचार वारंवार कार्यकर्त्यांनी करावा त्यासाठी सोशल मीडिया चांगले माध्यम आहे. मनुष्यबळ विकास महामंडळातील व सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. सावंत यांनी यावेळी केली.
केंद्राने मागील १० वर्षांत गोव्यासाठी ३० हजार कोटी रुपांचे विविध प्रकल्प दिले. यात झुआरी पूल, अटल सेतु, सुपर स्पेशलिटी इस्पितळ, आयुष इस्पितळ आदी अनेक प्रकल्पांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशामध्ये 'वन नेशन, वन इलेक्शन'ची अंमलबजावणी व्हावी, असा असा ठराव माजी सभापती अॅड. विश्वास सतरकर यांनी मांडला, उपस्थितांनी हात वर करून व जोरदार घोषणा देऊन तो ठराव संमत केला