

पणजी : पुढारी वृत्तसेवा
काही मतदारसंघांमध्ये भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत, तेथेही अनेकांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपमध्ये नसलेले काही नेतेही भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यावरून भाजप लोकप्रिय असल्याचे तसेच भाजपची उमेदवारी मिळाल्यास निवडून येण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होते.
मात्र, पक्ष म्हणून उमेदवारी देताना उमेदवाराची पक्षनिष्ठा, जिंकण्याची क्षमता, त्याचे एकूण काम आणि लोकप्रियता या बाबी विचारात घेऊनच उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाईक म्हणाले की, काही मतदारसंघांत भाजपचे आमदार असतानाही इतर नेते दावेदारी करत आहेत, ही गोष्ट खरी आहे. त्यात वावगे काही नाही. ही लोकशाही आहे. त्यामुळे इच्छा व्यक्त करणे गैर नाही.
गेली पंधरा वर्षे आपण आमदार नाही. २०१२ पर्यंत आपण आमदार होतो. त्यावेळी आपण केलेल्या विकासकामांना नंतर योग्य तो वेग मिळाला नाही. विद्यमान आमदार फक्त बोलतात, काही करत नाहीत. त्यामुळे लोक आपल्याकडे येतात. आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्र्यांच्या सहकार्याने लोकांची कामे करत आहोत. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई यांचा जळफळाट झाला आहे. फातोर्ड्यातील विकासकामांवर आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्यासोबत जाहीर चर्चेसाठी यावे, असे आव्हानही दामू नाईक यांनी दिले.
आदिवासी (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण हा घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे तो कोणीही नाकारू शकत नाही. त्यांना आरक्षण मिळते म्हणून इतरांनी त्यात अडथळा आणू नये. भाजपने आदिवासींच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आता राजकीय आरक्षणही भाजपचे डबल इंजिनचे सरकार देईल, असे नाईक म्हणाले.
धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात गावडा, कुणबी, वेळीप व धनगर (गाकुवेध) यांना एसटीचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन सुरू होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे धनगरांना वगळून इतरांना एसटीचा दर्जा मिळाला. आता धनगर समाजाची मागणी पूर्ण व्हावी, असे पक्षाचे धोरण असल्याचे नाईक यांनी सांगितले.