

पणजी : राज्यात सध्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांनी प्रवेश केल्याने पोलिस सक्रिय झाले आहेत. या टोळ्यांच्या असलेल्या लागेबांध्यामुळे राज्यात गँगवॉरसारखे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी तुरुंग महानिरीक्षकांनी पोलिस ताफ्यासह कोलवाळ कारागृहात धडक दिली. यावेळी केलेल्या कारवाईवेळी कैद्यांच्या खोल्यांमधून सुमारे 12 मोबाईल्स व अन्य साहित्य जप्त केले. यावेळी बिष्णोई टोळीचे गोव्यातील लागेबांधेसंबंधी काही कैद्यांची झाडाझडती घेतल्याची माहिती सूत्राने दिली.
बिष्णोई टोळीतील काहीजण गोव्यातील गँगवॉरमध्ये गुंतल्याच्या संशयावरून हल्लीच दोघांना दक्षिण गोव्यातील गँगवॉरमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांनी पोलिसांनी दिलेल्या जबानीत गोव्यातील काही गुन्हेगारही त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. यातील एक संशयित दिलीप कुमार हा ड्रग्जप्रकरणीच्या गुन्ह्यात कोलवाळ तुरुंगात आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीसाठी तुरुंग महानिरीक्षक के. आर. चौरासिया यांच्या नेतृत्वाखाली उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, तसेच काही पोलिस निरीक्षक व पोलिस फौजफाट्यासह सकाळी कारागृहाला धडक दिली. पोलिसांचे पथक आल्याची माहिती मिळताच अनेक कैद्यांचे धाबे दणाणले.
या पोलिस पथकाने कैद्यांच्या खोल्यांची झाडाझडती सुरू केली असता सुमारे 12 हून अधिक मोबाईल्स तसेच सिगारेट्स व तंबाखू इतर साहित्य सापडले. या कारागृहाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा तपासणीचे तीन कडे असतानाही हे सामान आत जात असल्याने महानिरीक्षक चौरासियाही चक्रावून गेले आहेत.
पोलिस अधीक्षकांनी ड्रग्जप्रकरणातील संशयित दिलीप कुमार याला खोलीतून आणून त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान काहीकाळ कारागृहातील सीसी टीव्ही कॅमेरे सुरू असल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला. या संशयिताची चौकशी दरम्यान गोव्यात आणखी कितीजणांशी त्याचे लागेबांधे आहेत याची माहिती वदवून घेण्याचा प्रयत्न केला.