

पणजी : आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनलेल्या गोव्यात देशांतर्गत पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मध्ये 83 लाख देशी तर 4.4 लाख विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. देशी पर्यटकांना गोव्याचे आकर्षण कायम आहे. हा ट्रेंड केवळ कोविड महामारीपूर्वीच्याच आकडेवारीला मागे टाकत नाही, तर पर्यटनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पुष्टी देतो असा दावा पर्यटन खात्याने केला आहे.
पर्यटन खात्याने म्हटले आहे की, कोविड-19 महामारीनंतर जागतिक पर्यटनाला मोठा सामना करावा लागत आहे. तरिही गोव्याचे आंतरराष्ट्रीय पर्यटन सुधारण्याच्या मार्गावर आहे. 2023 मध्ये 4.4 लाखांपेक्षा अधिक विदेशी पर्यटकांचे आगमन झाले, जे प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्यामुळे आणि जागतिक गतिशीलता सुधारल्यामुळे शक्य झाले. गोवा हे भारतातील एक राज्य आहे, परंतु गोव्याची तुलना श्रीलंकेसारख्या देशांशी केली जाते, हेच चूक आहे. आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी पॉईंट ऑफ कॉल आणि अतिरिक्त जागा हक्काचा पुनर्विचार करण्यासाठी, राज्य सरकार केंद्र सरकारसोबत काम करत आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मॉस्को, एकतेरिनबर्ग, लंडन, उझबेकिस्तान आणि कझाकस्तानसह अन्य प्रमुख ठिकाणांहून चार्टरची सुविधाही करण्यात आली आहे. यातील पॉलिश चार्टर विमान शुक्रवारी 8 रोजी दाखल होणार आहे. ही उड्डाणे केवळ समुद्रकिनारी पर्यटन याच्यापर्यंत मर्यादित नसून, अंतर्गत पर्यटन आणि दूधसागर धबधब्यासारख्या लोकप्रिय स्थळांना भेट देण्यासाठी असतात, असे पर्यटन खात्याने म्हटले आहे.
काही वेळा हवाई प्रवास व हॉटेलमुळे गोवा प्रवास महाग होतो. त्यामुळे संभाव्य पर्यटक अन्य पर्याय शोधतात. मात्र, गोव्याने कुटुंब, गट, जोडपे आणि एकट्या महिला प्रवाशांसह विविध श्रेणीतील प्रवाशांसाठी, सर्वोच्च सुट्टीचे ठिकाण म्हणून आपले स्थान मजबूत करण्याचे आव्हान कायम ठेवले आहे. पिंक फोर्स हा उपक्रम महिलांची सुरक्षितता आणि सोयी सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. यासह राज्यात पर्यटक हेल्पलाईन सेवा कार्यरत आहे. जी पर्यटकांना माहिती आणि मदत पुरवते. पर्यटन खात्याने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात ‘बीच व्हिजिल’चा समावेश असून तो गोव्यातील समुद्र किनार्यांवरील सुरक्षा मजबूत करतो. त्याचे देशी व विदेशी पर्यटकांनी विशेष कौतुक केले असल्याचे पर्यटन खात्याने म्हटले आहे.