पणजी : अनिल पाटील
गोव्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून इथला प्रत्येक व्यक्ती कलावंत आहे. हे भजन स्पर्धाना मिळणाऱ्या प्रतिसादावरून स्पष्ट होते. गोवा देशाचे पर्यटन केंद्र आहेच मात्र त्याबरोबर ते सांस्कृतिक केंद्र ही होईल. तसेच भजनयुक्त गोवा, व्यसनमुक्त गोवा बनेल अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी (दि.15) व्यक्त केली. मनोहरबुवा शिरगावकर राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या सांगता समारंभावेळी ते बोलत होते.
तब्बल एक महिन्याहून अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेत राज्यातील हजारो भजनी कलाकार सहभागी होतात. बाल, महिला आणि पुरुष अशा तीन गटातील या स्पर्धा विभागीय आणि राज्यस्तरावर होतात. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, कला अकादमीचे सदस्य सचिव अरविंद खुटकर, कला आणि संस्कृती खात्याचे सचिव सगुण वेळीप, कार्यक्रम अधिकारी संजय झर्मे, प्रदीप गावकर उपस्थित होते. अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरुषांच्या स्पर्धेत भगवती चिंबलकरीन भजनी मंडळ चिंबल, तिसवाडी या पथकाने प्रथम क्रमांक मिळवला. तर महिलांच्या स्पर्धेत नागेश महारुद्र भजनी मंडळ कुडका तिसवाडी पाहिले आले.तर मुलांच्या बाल स्पर्धेत शांतादुर्गा जांभळेश्वर भजनी मंडळ कळंगुट प्रथम आले.