

वास्को/मडगाव : बायणातील दरोड्याचा मुरगाव पोलिसांनी आठ दिवसांत छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी मूळचे ओडिशाचे असलेल्या सहाजणांना मुंबई येथे अटक केली आहे. त्यांच्याकडून काही ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बायणा येथे भेळपुरी, पाणीपुरी, सामोसे विक्री करणार्या मूळच्या ओडिशातील मुख्य सूत्रधाराचा समावेश असल्याचे समजते. काहींच्या मते मुख्य सूत्रधार हा सागर नायक यांच्याकडे काम करीत होता. तथापी काही महिन्यांपूर्वी त्याने काम सोडले. त्यानंतर तो ओडिशामध्ये गेल्याचे समजते. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये त्या मुख्य सूत्रधाराचा समावेश आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
बायणातील चामुंडा आर्केडच्या सहा मजल्यावर राहणारे सागर नायक यांच्या प्लॅटवर सात-आठ जणांनी दरोडा घातला होता. यावेळी त्यानी सागर नायक यांच्या डोक्यावर लोखंडी कांबीने प्रहार करून रक्तबंबाळ केले होते. सागर यांची पत्नी हर्षा, मुलगी नक्षत्रा यांनाही मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घालून दरोडेखोर सोने चांदीचे दागिने व रोकड असा मोठा ऐवज घेऊन पळाले होते. त्यांनी अगदी नियोजनबध्दरित्या हा दरोडा घातला होता. अवघ्या तीस चाळीस मिनिटामध्ये त्यांनी फ्लॅट लूटून इमारतीच्या मागील बाजूने पळ काढला होता. त्यांनी हेल्मेट व मास्क बांधल्याने त्यांची ओळख पटणे कठीण होते. पोलिसांनी आपल्या परिने तपास सुरु केला होता.तथापी जसजसे दिवस जाऊ लागले,तसतशा लोकांच्या प्रतिक्रिया वाढू लागल्या होत्या. काहीजणांनी पोलिसांच्या एकंदर कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तथापी पोलिसांनी दरोड्याच्या प्रगतीसंबंधी कोणतीही वाच्यता न करता आपला तपास सुरु ठेवला होता.
मुंबई येथे सहाजणांना ताब्यात घेऊन लुटेलेल्या ऐवजातील बराचशी ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सागर नायक यांना काल रात्री मिळाल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. पोलिसांच्या कामावर माझा विश्वास होता. तथापी काहीजण माझ्याकडे पोलिसांच्या तपासासंबंधी प्रश्न उपस्थित करीत होते. त्यांना माहित नव्हते की, पोलिस त्या दरोडेखोरांचा शोध लावण्यासाठी रात्रदिवस कशी धावपळ करतात. मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक जॅकीस शेरीप, उपअधीक्षक गुरुदास कदम हे सतत माझ्याशी संपर्क साधून होते. ते माझ्याकडे कामाला असलेल्या निरनिराळ्या कामगारांची माहिती घेत होते. ते इतर फोटोही दाखवून याला ओळखतो काय असे प्रश्न विचारीत होते. ते योग्य दिशेने तपास करीत आहेत याबद्दल मी निश्चित होतो. मात्र पोलिस तपासकार्याची कोणतीही माहिती देत नव्हते यामागील कारण उघड होते. असे नायक म्हणाले. मुरगाव पोलिसांनी एक ब्लाईंड केसचा पोलिसांनी योग्यरित्या अभ्यास करून छ़डा लावल्याबद्दल खूप आनंद होत आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत, पोलिस महासंचालक, महानिरीक्षक उपमहानिरीक्षक, दक्षिण गोव्याचे अधीक्षक, वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम, निरीक्षक वैभव नाईक, शेरीफ जॅकीस व इतर पोलिसांचे आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान निरीक्षक शेरीफ यांनी सागर नायक यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी सागर नायक यांनी त्यांचे अभिनंदन केले. शेरीफ यांनी सदर प्रकरणाचा छ़डा लावण्यासाठी आम्ही खूप परिश्रम घेतले. जे परिश्रम घेतात,त्यांना यश मिळते असे ते म्हणाले. मुरगावतील तसेच इतर पोलिसांच्या मदतीने सदर प्रकरणाचा छ़डा लागला. पोलिस पथके गोव्याबाहेर इतर राज्यांमध्ये गेली होती. शेवटी ते दरोडेखोर हाती लागले.त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांबद्दल काही लोक वाटेल ते बोलत होते, त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष न देता सातत्याने काम केले. जर आम्ही या प्रकरणाची माहिती देत राहिलो असतो,तर दरोडेखोरांना तपासाची सर्व माहिती मिळत राहिली असती, असे त्यांनी स्पष्ट केले. सदर दरोड्याप्रकरणी पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा वर्मा यांनी आव्हान स्वीकारले होते. त्यांनी आव्हान पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
सदर दरोडा घालताना दरोडेखोरांनी जे नियोजन आखले होते. त्यांनी एकही पुरावा राहणार नाही, याची खबरदारी घेतली होती. तथापी त्यांनी अतिशय नियोजनबद्ध दरोडा घातल्याने ते संशयांच्या फेर्यामध्ये अडकले होते.त्या इमारतीची एवढी खडानखडा माहिती एखाद्या माहितीगारालाच असली पाहिजे. तिजोरीबद्दल विचारणा करणे, कारची चावी घेतल्यावर थेट त्याच कारसमोर जाणे, लोखंडी ग्रिल्स नसलेल्या किचनच्या खिडकीसमोर जाणे, या सर्व गोष्टी कोणातरी माहितीगाराला असल्या पाहिजेत, हे मुद्दे पोलिसांनी हेरले होते. त्यामुळे पोलिसांनी सागर नायक यांच्या काही आजी-माजी कामगारांवर तसेच इतर काहीजणांवर आपले लक्ष अधिक केंद्रीत केला. त्यातूनच पुरावा मिळत गेला. दरोडा घातल्यावर चोरटे मुंबईला कसे निसटले हा प्रश्न आहे. तो एकत्रितपणे गेले की वेगवेगळे गेले,त्यांनी रेल्वे, बस की आणखी कोणत्या मार्गाचा अवलंब केला. यासंबंधी त्यांना गोव्यात आणल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सदर अस्पष्ट गुन्ह्याचा अवघ्या आठ दिवसांमध्ये छ़डा लावल्याबद्दल मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी निरीक्षक शेरीफ जॅकीस यांच्यासह इतर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. सदर गुन्ह्याचा छ़डा लावणे ही एक प्रशंसनीय कामगिरी आहे. त्या कामगिरीचा मुरगाववासियांना अभिमान वाटत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.