

वास्को : बायणातील दरोड्याच्या निमित्ताने सुमारे 33 वर्षांपूर्वी वास्को शहरात भरदिवसा झालेल्या दरोड्याच्या आठवडी जाग्या झाल्या. त्या दरोड्यातील दरोडेखोरांना अवघ्या तीन तासांमध्ये अटक करण्याची कामगिरी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी चोख बजावली होती. यातील सातही दरोडेखोरांना 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती. या जिगरबाज पोलिसांमध्ये तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सॅमी तावारिस, तत्कालीन उपनिरीक्षक उदय नाईक, तत्कालीन उपनिरीक्षक गजानन प्रभूदेसाई आदींचा समावेश होता.
31 मे 1993 रोजी सकाळी अकरा साडेअकराची वेळ होती. मुरगाव तालुका सहाय्यक भाग शिक्षणाधिकारी कार्यालयातील कॅशियर यशवंत बांदोडकर, सहाय्यक भाग शिक्षणाधिकारी आंद्रांदे, क्लार्क लता व अन्य दोन शिपाई हे भारतीय स्टेट बँकेतून सुमारे सहा लाख रुपयांची रोकड घेऊन निघाले होते. त्यावेळी शिक्षकांना भाग शिक्षणाधिकारी कार्यालयात रोखीन वेतन दिले जायचे. त्यासाठी सदर रोकड नेली जात होती. बांदोडकर यांच्याकडे चार लाख तर शिपायाकडे दोन लाख रुपये असलेली बॅग होती. ते पाचजण अंतर्गत रस्त्याने रोकड घेऊन कार्यालयाकडे येत असतानाच कोसंबी बिल्डिंगजवळ अचानक काहीजणांनी चॉपर, कोयत्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी बांदोडकर व शिपायाच्या हातातील रोकडच्या बॅगा ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिपाई बॅगेसह कार्यालयात धावला.
इकडे दरोडोखोर बांदोडकर यांच्या हातातील बॅग ओढू लागले. परंतु बांदोडकर बॅग देईनात. त्यामुळे त्या दरोडेखोरांपैकी एकाने त्यांच्या हातावर चॉपरचा वार केला. त्यामुळे बांदोडकर यांनी हातातील बॅग आंद्रादेकडे फेकली. त्यावेळी दरोडेखोरांनी आंद्रादेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जखमी बांदोडकर यांनी हल्लेखोराला मागे खेचले. त्यामुळे त्या हल्लेखोराने बांदोडकर यांच्या डोक्यावर चॉपरचा वार केल्याने, बांदोडकर रक्तबंबांळ झाले. त्यानंतर ते दरोडेखोर चार लाखाची रोकड घेऊन व्हॅनमधून पळाले.
याप्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांनी त्वरित हालचाली केल्या. तत्कालीन निरीक्षक आपा तेली व उपअधीक्षक मोराईस यांच्यासह उपनिरीक्षक सॅमी तावारिस, उदय नाईक, गजानन प्रभूदेसाई व अन्य पोलिस दरोडेखोरांच्या मागावर निघाले. त्याकाळी एकच जीप असल्याने ॲड. राजन नाईक यांनी आपल्या फियाटमध्ये सॅमी तावारिस व इतरांना घेऊन ते मांगोरहिल मार्गाने निघाले, तर चिखली बाजूने उदय नाईक हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जीपने निघाले. मांगोरहिल येथे एका सायकलला त्या व्हॅनने ठोकरल्याची माहिती मिळाली.
त्या व्हॅनचा अपुरा क्रमांक मिळाला होता. त्याआधारे ते पुढे निघाले असताना ती व्हॅन पुन्हा वास्कोकडे येत असल्याचे दिसले. तावारिस यांनी अडवून वाहनचालकाकडे चौकशी केली. आपली व्हॅन कासावलीपर्यंत भाड्याने ठरविली होती, असे चालकाने सांगितले. त्याला घेऊनच सॅमी तावारिस पुढे निघाले. कासावली येथे त्या दरोडेखोरांचा शोध घेत असताना दोन युवक पायी जात असल्याचे दिसले. त्यांना त्या व्हॅनचालकाने ओळखल्यावर, त्यांना पकडण्यासाठी तावारिस यांनी चालत्या वाहनातून उडी मारली. पोलिसांना पाहून दरोडेखोर पळू लागले. त्यापैकी एकाचा तावारिस यांनी पाठलाग सुरू केला. तो हाती लागेना. त्यावेळी तावासिर त्यांनी पिस्तूलातून एक गोळी हवेत झाडली. त्यानंतर दरोडोखोराने शेतातून धावण्याचा प्रयत्न केला. मात्र, फुटबॉलपटू असलेल्या तावारिस यांनी कुंपणावरून उडी घेत त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपले इतर साथीदार कासावली येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर इतर पोलिसांच्या मदतीने त्यांनाही पकडण्यात आले.
कासावलीतून सहा दरोडेखोरांना अटक...
दरोड्यातील चार लाख रुपये असलेली बॅग घेऊन मास्टरमाईंड व्हिन्सी हा केरळमध्ये पळाला होता. व्हिन्सी याची प्रेयसी कासावली येथे राहत होती. त्यामुळे इतर दरोडेखोर तेथे थांबले होते. त्यामुळेच सहा दरोडेखोर कासावलीत पोलिसांच्या तावडीत सापडले.
मुख्य सूत्रधाराला केरळमधून अटक...
उदय नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक पोलिस पथक केरळला गेले. तेथे तपास करून व्हिन्सी याला अटक करून तीन लाखांची रोकड जप्त केली. न्यायालयाने दरोडेखोरांना दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. त्यापैकी मुख्य सूत्रधार व्हिन्सी हा एका अपघातात मरण पावला होता.