

पणजी : बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ७ बँक युनियनची मध्यवर्ती संस्था असलेल्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' ने शुक्रवार, दि. ११ रोजी एक दिवसीय देशव्यापी बँक संपाची हाक दिली आहे.
प्रलंबित रास्त मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी बँक कर्मचारी आणि अधिकारी हा संप पुकारला आहे. यात गोवा विभागही सहभागी होणार आहे. पाच दिवसांच्या बँकिंगची तत्काळ अंमलबजावणी करावी, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना मागे घ्यावी या प्रमुख मागण्या आहेत.
सरकारने या मागण्यांकडे तत्काळ लक्ष न दिल्यास युनियन टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करेल. पहिला टप्पा २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांचा देशव्यापी संप असेल. तरीही मागण्या मान्य न झाल्यास दि. २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संप करण्यात येईल. जनतेला या लढ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन गोवा युनिट संयोजक संतोष वाय. हळदणकर यांनी केले आहे.