

कारवार : बंगळूरहून गोव्याला जाणारी खासगी आराम बस बुधवारी एका लॉरीला धडकून पलटी झाली. त्यात बसमधील 60 पैकी 25 प्रवासी जखमी झाले. तथापि, बस 60 फूट दरीत कोसळण्यापासून बालंबाल बचावल्याने प्रवाशांचे प्राण वाचले. लॉरीही बसला धडकून रस्त्याशेजारच्या झाडांमध्ये अडकली; अन्यथा लॉरीही दरीत कोसळली असती.
कारवार जिल्ह्यातील यल्लापूरजवळच्या अरबैल घाटात बुधवारी हा अपघात घडला. 25 प्रवाशांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी बस बंगळूरहून गोव्याला जात होती. अरबैल घाटात एका वळणावर बस येताच लॉरीने बसला धडक दिली. त्याबरोबर बस पलटी झाली, तर लॉरी रस्त्याशेजारच्या झाडांना धडकली. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी यल्लापूर पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.