

म्हापसा : एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी स्टॅन्ली कार्लोस कुतिन्हो (वय 36, रा. तिवाईवाडा, कळंगूट) या संशयितास अटक केली आहे. काणका येथे राहणारी आठ वर्षीय अल्पवयीन मुलगी गुरुवारी (दि.24) रात्री घराच्या परिसरात खेळत असताना संशयिताने जबरदस्तीने तिचा हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिच्या घरचे व शेजारी बाहेर धावून आले तसे तो संशयित पळून गेला.
त्या मुलीच्या वडिलांनी म्हापसा पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास कामास सुरुवात केली. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित त्या मुलीला घेऊन जाताना दिसला. संशयिताची माहिती मिळाल्यानंतर म्हापसा पोलिसांनी संशयित स्टॅन्ली कुतिन्हो याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित स्टॅन्ली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध या अगोदर पाच गुन्हे नोंद झालेले आहेत.