

पणजी : अॅसिड हल्ला करणार्या संशयित हल्लेखोरास उत्तर गोवा पोलिसांनी अवघ्या 9 तासांत म्हापसा-करासवाडा येथे पकडले.
युवकाचे वडील उमेश शेट्ये यांनी दिलेल्या तक्रारीवरून हल्ला करणार्याविरोधात पेडणे पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 124 (1), 109 तसेच गोवा बाल संरक्षण कायदा कलम 8 (2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
घटनेनंतर पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक विवेक हळर्णकर, प्रवीण सिमेपुरुषकर, प्रथमेश पार्सेकर, तुकाराम चोडणकर, साहिल नाईक आणि मोप विमानतळ तसेच मांद्रे पोलिस ठाण्यातील अधिकार्यांचे विशेष पथक नेमण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी नीलेश गजानन देसाई याला करासवाडा आयडीसी, म्हापसा येथे अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, एका महिन्यापूर्वी त्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास सिंधुदुर्ग पोलिस करत आहेत. पीडित मुलगा आणि आरोपीची मुलगी यांच्यात कथित प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीने केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वापरलेले अॅसिड तो ज्या कंपनीत काम करत होता तेथून आणल्याची शक्यता आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. घटनास्थळावरून अॅसिड आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक साहिल नाईक करत असून पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पेडणे पोलिस सलीम शेख आणि पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
ज्या ठिकाणी घटना घडली तेथून जवळच असलेल्या एका घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्याचे फुटेज मिळाल्यानंतर हल्ल्यातील संशयित कोण आहे. त्याचा तपास लागणार होता. पोलिसांनी धारगळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू केला असता. त्यांना फुटेजमध्ये हल्लेखोर सापडला.