मडगाव : रुमडामळ-दवर्लीचे पंचायत सदस्य विनायक वळवईकर यांच्यावर मडगावच्या पॉवरहाऊस येथे सात जणांच्या गटाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. या हल्ल्यात वळवईकर यांना बरीच दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डा येथून रुमडामळ येथे येत असताना वळवईकर यांना त्यांच्या कामगाराने फोन करून दुकानावरील सामानाची काहीजण नासधूस करत असल्याचे सांगितले. वळवईकर हे त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावर मागून एकाने हल्ला चढवला. त्यांच्या डोक्यावर बाटली फोडण्यात आली. वळवईकर यांनी हा नियोजित हल्ला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आपण त्याठिकाणी पोचताच पाच जणांच्या जमावाने आपल्यावर हल्ला केला. त्यांचे साथीदारही तिथेच होते. एकएक करून सुमारे सात जण तिथे जमा झाले. काही कळण्याच्या आत आपल्यावर हल्ला चढवला. नाक आणि डोळ्यांवर ठोसे लगावले अशी माहिती त्यांनी दिली. काही जणांना आपण ओळखत असल्याचे त्यांनी सांगीतले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. वळवईकर यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता. वळवईकर यांचे हिंदुत्ववादी संघटनेशी संबध आहेत. मारूती मंदिरासमोरील संभाजीराजे यांची मूर्ती काढली जावूनये यासाठी त्यांनी भूमिका घेतली होती. पंचायत परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बीफच्या दुकानाविरुद्ध आवाज उठवला होता.
पाच लाख देतो प्रकरण कॉम्प्रमाईझ करूया, तुम्ही प्रकरण मागे घेतले नाही तर विनाकरण तुम्हाला न्यायालयात खेपा माराव्या लागतील, अशी ऑफर घेऊन आलेल्या दोन पोलिस उपनिरीक्षकांनी पोलिस खात्याची लक्तरे वेशिवर टांगली आहेत. विनायक वळवईकर म्हणाले, 17 तास उलटून गेल्यावर तक्रार नोंद होते, ही अतिशय निराशाजनक बाब आहे. तक्रार नोंदवली जावी यासाठी मला मोठ्या व्यक्तीस फोन करून सांगावे लागले. 17 तास उलटूनही कोणाला अटक झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मगणी वळवईकर यांनी केली आहे.