

पणजी : ज्येष्ठ नागरिकांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून 40 हजार रुपये व एका व्यावसायिकाचे 1,17,000 रुपये लंपास करणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गोवा पोलिसांनी अत्यंत शिताफीने एटीएम स्वॅपिंग करणारी आंतरराज्य टोळी पकडली. तिघेही हिसार हरियाणा येथील असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा भामटा फरार झाला आहे. त्यांनी डिचोली, पणजी आणि म्हापसा येथे एटीएम कार्डची अदलाबदल करून खात्यातून पैसे काढले, अशी माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
मये येथील वासुदेव शंकर सावंत (वय 79, सेवानिवृत्त कर्मचारी, रा. चिमुलवाडा,मये, डिचोली) हे डिचोली चर्चस्क्वेअर येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. सावंत यांना पैसे काढण्यात अडचण येऊ लागली म्हणून चोरट्यांनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन दुसरे एटीएम दिले आणि ते पिन टाकत असताना तो पाहिला आणि तत्काळ बोर्डे, डिचोली येथील बँकेत जाऊन चार वेळा 10 - 10 हजार असे 40,000 काढले. त्यांनी सावंत यांच्याकडे दिलेले एटीएम कार्ड सैय्यद गफार सैय्यद या बँक खातेदाराचे आहे.
अटक केलेल्यांची नावे संजय प्रेमसिंग महेस्वाल (वय 33) व सोनू ओमप्रकाश कुमार (वय 32,दोघेही रा.हासी,हिसार,हरियाणा) अशी आहेत. फरार झालेल्या तिसर्या संशयित आरोपीचे नाव संजय हवा सिंग मंडी (वय 34, बरवाला,हिसार हरियाणा) असे आहे.
दरम्यान, या तिघांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन भाड्याच्या दुचाकी (जीए 03 व्ही 8732 आणि जीए03 -एच 7749) पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी त्यांनी खोबरावाडो,कळंगुट येथील किशोर विनायक दिवकर यांच्याकडून घेतल्या होत्या. ते दिवकर यांच्याच गेस्ट हाऊसमध्ये भाड्याने राहत होते. डिचोली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीधर कामत, रश्मी परब, पोलिस कॉन्स्टेबल विशाल परब, दयेश खांडेपारकर आणि शैलेश दवणे यांच्या पथकाने त्यांना अटक केली.
पोलिसांनी संशयित सोनू कुमार याच्याकडून वासुदेव सावंत यांचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या बँकांची 22 एटीएम कार्ड,620 रुपये व गुन्ह्यावेळी त्याने वापरलेले कपडे व दुचाकी,तसेच दुसरा संशयित संजय महेशवाल याच्याकडून विविध बँकांची 19 एटीएम कार्ड,मोबाईल,1070 रुपये,दुचाकी आणि कपडे जप्त केले.
दरम्यान, पोलिस चौकशीत त्यांनी तक्रारदार आसिफ अमन शेख, (40वर्षे, भाटले-पणजी) यांचे 26 जून रोजी दुपारी 3 वाजता मदत करण्याच्या बहाण्याने पणजी येथील एटीएममध्ये कार्ड बदलले आणि पर्वरीत जावून एटीएम कार्डचा वापर करून तक्रारदाराच्या खात्यातून 1,17,000 रुपये लंपास केले. विशेष म्हणजे या दोघांनी आतापर्यंत दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, कर्नाटक आणि झारखंड सारख्या राज्यांमध्ये 100 हून अधिक एटीएम चोरी केल्या आहेत. हे संशयित आरोपी 21 जून रोजी हरियाणाहून इंदूरला जाणार्या आंतरराज्य बसेसमधून हरियाणाहून गोव्यात आले होते, त्यानंतर 22 जून रोजी इंदौरहून महाराष्ट्रातील मलकापूर आणि पुढे 23 जून रोजी ते सोलापूर, महाराष्ट्रात पोचले. पुढे 24 जून रोजी ते कर्नाटकातील विजापूर येथे पोहोचले आणि कर्नाटकातील विजापूरहून ते म्हापसा, गोवा येथे 25 जून रोजी आले. तिथे त्यांनी एक ऑटोरिक्षा भाड्याने घेतली आणि प्रेमा गेस्ट हाऊस नावाचे हॉटेल बुक करण्यासाठी कळंगुट येथे गेले आणि त्याच मालकाकडून दोन दुचाकी भाड्याने घेतल्या. आणि त्यानंतर एटीएम वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी त्या स्कूटरचा वापर केला.
विशिष्ट क्षेत्रातील एटीएम मशीनला भेट देऊन आणि एटीएम कार्डवर फेविकॉल लावून एटीएम स्लॉटमध्ये काही काळ बिघाड घडवून आणणे, पुढे एटीएम कार्ड स्वॅप करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने पिन पाहून कार्डची अदलाबदल करून ग्राहकाला लक्ष्य करणे अशी त्यांची गुन्हा करण्याची पद्धत (मोडस ऑपरेंडी) होती. अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.