

पणजी ः सांतिनेझ - पणजी येथील श्री आप्टेश्वर सिद्धिविनायक देवस्थानच्या पुनः प्राणप्रतिष्ठा व श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्वार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आल्या. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
हा उत्सव 9 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून या काळात विविध धार्मिक विधी तसेच कोकणी नाटके तसेच गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून श्री आप्टेश्वर सिद्धिविनायक देवस्थानच्या पुनः प्राणप्रतिष्ठा व श्री गणेश मंदिराचा जीर्णोद्वार सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी मधूपर्क पूजन तसेच 11.55 च्या मुहुर्तावर प्रतिष्ठा महापूजा, प्रतिष्ठांग होम बलिदान व त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद व महाप्रसाद झाला. नव्याने बांधण्यात आलेल्या देवस्थानचे मंदिर भक्तगणांचे लक्ष आकर्षून घेत होते. सकाळपासून भाविकांची मोठी उपस्थिती होती. तेथील मंदिरासभोवतालच्या परिसरात उत्कृष्ट रोषणाई करण्यात आली होती. या मंदिराला सफेद रंग देण्यात आल्याने रात्रीच्या रोषणाईमध्ये हे मंदिर दिमाखदार दिसत होते.