

बोरी : राजकीय लाचारी पत्करण्यास भाग पाडलेल्या राजकारण्यांना धडा शिकवा, असे आवाहन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी मंगळवारी केले. शिरोडा येथील श्री रवळनाथ मंदिर सभागृहात तुडूंब भरलेल्या मराठीप्रेमींच्या निर्धार मेळाव्यात प्रा. वेलिंगकर बोलत होते.
प्रा. वेलिंगकर म्हणाले, महिलांनी व युवासेनेने गोव्याची अस्मिता व संस्कृती टिकविण्यासाठी मराठी राजभाषेच्या आंदोलनात सहभागी व्हावे. कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. 40 वर्षांपूर्वी पेटविलेल्या ज्योतीला आपण येत्या दोन वर्षांत प्रखर करून सरकारला जागे करूया.
यावेळी वेलिंगकर यांनी ग्रामसमितीची निवड करून सर्व नारीशक्ती व युवायुवतींना बरोबर घेऊन मराठी भाषेला राजभाषेचा मुकुट चढविणार असे सांगितले. उपस्थितांचे स्वागत गोविंद देव यांनी केले. गोविंद देव म्हणाले, म्हापसा येथे पार पडलेल्या भाजपच्या राज्य अधिवेशनात माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतलेल्या ठरावात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा लवकरात लवकर द्यावा. यावेळी श्रावणी नाईक यांनी पोवाडा गाऊन मराठीप्रेमींमध्ये ऊर्जा निर्माण केली. वंदना पाटील यांनी व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करून दिली. मराठीचा उगम गोव्यात झाल्याचा दावा गो. रा. ढवळीकर यांनी केला व वेगवेगळ्या साहित्य व मराठी भाषेतील साहित्याची माहिती दिली. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळायलाच पाहिजे, असे मत ढवळीकर यांनी व्यक्त केले. या वेळी सुभाष वेलिंगकर यांनी उपस्थित मराठीप्रेमींना प्रतिज्ञा दिली. रुपेश नाईक यांनी आभार मानले. पसायदानाने निर्धार मेळाव्याची समाप्ती झाली.