

पणजी : मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सुमारे ८ कोटींच्या गांजा प्रकरणातील संशयित अन्सारी फहाद महम्मद साजिद याला मेरशी येथील सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने तसेच त्याच्याकडे हा गांजा कसा आला, याचे स्पष्टीकरण देऊ शकला नसल्याचे आदेशात न्यायालयाने म्हटले आहे.
मोप येथील कस्टम्स अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे २५ मार्च २०२६ रोजी भोप विमानतळावर संशयित अन्सारी फहाद महम्मद साजिद याच्यासह बँकॉक व अबूदाबी व्हाया मस्कत येथून आलेल्या पाच प्रवाशांची तपासणी केली होती. त्यामध्ये संशयित अन्सारी याच्यासह इतर दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या प्रवासी बॅगची तपासणी केली असता फूड पॅकेट्समध्ये लपवलेला गांजा सापडला. या पॅकेट्समधील जप्त करण्यात आलेला गांजा २३ किलो ८३२ ग्रॅम होता. याप्रकरणी कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती.
या प्रकरणातील संशयित अन्सारी फहाद महम्मद साजिद याने जामिनासाठी अर्ज करून या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने तो अमान्य केला.