

पणजी : पैसे देऊन नोकरी देण्याच्या प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या पूजा नाईक हिने 600 नोकरीसाठी 17 कोटी एका मंत्र्याला आणि एका अभियंत्याला दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर पूजा नाईक हिला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
पूजा नाईक हिने शुक्रवारी या प्रकरणी खुलासा करताना सांगितले होते की, तिने एका मंत्र्याच्या सचिवाकडे आणि मुख्य अभियंत्याकडे मिळून आपण 17 कोटी रुपये 600 नोकरीसाठी दिले होते. मात्र नोकऱ्या दिल्या नाहीत व पैसेही परत केले नाहीत. त्यांनी जर ते पैसे परत केले नाहीत तर आपण त्यांची नावे घोषित करणार असल्याचे तिने म्हटले होते. त्यावर अमित पाटकर म्हणाले, राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. त्यासोबत भ्रष्टाचारही वाढलेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करून पोलिस चौकशी सुरू करावी. त्यासोबतच पूजा नाईक हिच्या जीवाला धोका असल्याने तिला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.