

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. तालुक्यातील अंबोली-वेळुंजे प्रवाही वळणयोजनेला महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने अखेर ४९.२६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या योजनेमुळे पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आता पूर्ववाहिनी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार असून, स्थानिक भागासह गोदावरी खोऱ्यातील पाणीटंचाई दूर करण्यास मदत होणार आहे.
ही योजना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत (छत्रपती संभाजीनगर) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली आणि वेळुंजे गावाजवळ प्रस्तावित आहे. दमणगंगा खोऱ्यातील वालनदीच्या स्थानिक नाल्यावर हा प्रकल्प साकारला जाईल.
या प्रकल्पातून दमणगंगा खोऱ्यातील ०.६०६ चौ.कि.मी. पाणलोट क्षेत्रातून एकूण ०.९०७ दलघमी (३२.०४ दलघफू) पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध पाण्यापैकी ०.१३७ दलघमी (४.८३ दलघफू) पाणीसाठा (मृतसाठा धरून) स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येईल. उर्वरित ०.७७ दलघमी (२७.२१ दलघफू) पाणीसाठा पावसाळ्याच्या दिवसांत ६८५ मीटर लांबीच्या उघड्या चराद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यात वळवला जाईल.
जलसंपदा विभागाच्या २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित या प्रकल्पाची एकूण किंमत ४९.२६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष कामाचा खर्च ४६.०० कोटी रुपये असून, आनुषंगिक खर्च ३.२६ कोटी रुपये इतका आहे.
असा होणार प्रकल्पावर खर्च
भूसंपादन : १३.४६ कोटी
प्रत्यक्ष सी-काम : २४.३३ कोटी
पूल उभारणी : ३.९० कोटी
दळणवळण : ३.७० कोटी
इमारती, वृक्षारोपण व इतर कामे : ०.६१ कोटी
शासनाची प्रकल्पाला सशर्त परवानगी
हा प्रकल्प राबवताना गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला काही कडक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासन मान्यतेशिवाय प्रकल्पात नवीन आर्थिक दायित्व निर्माण करणाऱ्या घटकांचा समावेश करता येणार नाही. मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन अतिरिक्त खर्च होणार नाही, याची पूर्ण जबाबदारी महामंडळाची असेल. प्रकल्पाला 'युनिक पायाभूत सुविधा आयडी' देणे आणि याची माहिती 'पंतप्रधान गतिशक्ती पोर्टल'वर अपलोड करणे बंधनकारक राहील.