

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राजकीय पक्षांची आघाडी हे वेगळेच रसायन असते. आघाडी म्हणजे प्रत्येकाने लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या विविध गोष्टींचा त्याग असतो. त्यामुळे आम्ही त्याग करण्यास तयार आहोत, त्यामुळे आमच्यात वाद होणार नाहीत, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि आरजीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार वीरेश बोरकर यांनी आघाडीचा प्रवास उलगडून दाखवला.
चोडणकर यांनी सांगितले की, आम्ही विचारधारेमुळे एकत्र आलो. आमच्या भावना राष्ट्रीय आहेत, तर आरजीपीच्या प्रादेशिक आहेत. असे असले, तरी दोन्ही पक्षांची घटना समान आहे. त्यामुळे आम्हाला एकत्र येणे सोपे पडले. दोन्ही पक्षांचा स्थानिक पातळीवर आणि चाळीसही मतदारसंघांत दांडगा संपर्क आहे.
सुरुवातीला आम्ही ऑफ कॅमेरा दोन सभा घेतल्या. त्यातून विश्वास वाढला. त्यानंतर पत्र पाठवले आणि आरजीपीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ऑन कॅमेरा बैठका झाल्या. सध्या जागावाटपासंदर्भात बोलणीही सुरू झाली आहे. आरजीपीकडून जागांसंदर्भात प्रस्तावही आला आहे. त्यावर पितृपक्ष पंधरवड्यानंतर चर्चा केली जाणार आहे. दोन्ही पक्ष त्याग करतात, तेव्हाच आघाडी होते.
आम्ही त्याग करायला तयार असल्याने आघाडी अतूट राहणार आहे, असेही चोडणकर म्हणाले.
बोरकर म्हणाले की, किमान समान कार्यक्रम आणि त्यातील ११ मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. जागावाटप पितृपक्ष पंधरवड्यामुळे थांबले आहे. गोव्यासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. मात्र, गोव्यातील लोकांनी आमच्यासोबत यायला हवे.
भाजपचा पराभव करायचा असेल, तर लोकभावनेनुसार विरोधकांनीही एकत्र यायला हवे.
चोडणकर म्हणाले की, राज्यावर ४० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा, सरकारची ऋण काढून सण साजरी करण्याची वृत्ती व अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली. भाजप आमच्यात फूट पाडण्यासाठी आरजीपीचे चिन्ह गोठवण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
आम्ही राजकीय लढाई लढत असलो, तरी भाजप आणि निवडणूक आयोग व सभापती मिळून महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे पक्ष फोडू शकतात. त्यासाठी लोकांनी आमच्याबरोबर यायला हवे. बोरकर म्हणाले की, महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही घडू शकते.
काँग्रेस-आरजीपी एकत्र येतात म्हटल्यावर पक्षातील लोकांना हाताशी धरून भाजपला मदत होईल. जिल्हा पंचायतीवेळी आमची आघाडी होणार होती. मात्र, काहींनी संभ्रम निर्माण केल्याने आघाडी तुटली. पण, ती माझ्यामुळे तुटली नाही. गोव्यासाठी आजही आघाडी आवश्यकच आहे, असेही बोरकर म्हणाले.
गोवा फॉरवर्डचे घटस्फोट न घेताच दुसरे लग्न...
गोवा फॉरवर्ड पक्षाशी आमची आघाडी आहे, असे आम्ही म्हणत होतो. मात्र, घटस्फोट न घेता गोवा फॉरवर्डने लग्नगाठ बांधली. त्यामुळे आघाडी तुटली असे वाटत असताना पुन्हा नवी चर्चा सुरू झाली. 'आप'लाही आम्ही पत्र पाठवले होते. राज्य संयोजक वाल्मिकी नाईक आघाडीसाठी तयार होते. पण, राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. नंतर पुन्हा केजरीवाल युती हवी म्हणत होते. पण, तेवढ्यातच होर्डिंग्स आणि वेगळ्या युतीची चर्चा झाली. तथापि, लोकांची इच्छा ती आमची इच्छा असल्याने आम्ही गोवा फॉरवर्ड आणि 'आप'शी आघाडी करायला तयार आहोत, असेही चोडणकर म्हणाले.
'तो' गद्दारच...
पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन कार्यकाळ पूर्ण न करता किंवा राजीनामा न देता पक्षांतर करतो, तो गद्दारच. अशा गद्दारांना बेकायदेशीरपणे भाजपकडून सामावून घेतले जाते, असे चोडणकर आणि बोरकर यांनी नमूद केले.