

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
जनतेकडून पात्र म्हणून उपाधी मिळालेले रवी नाईक हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते म्हणून त्यांची आठवण कायम राहावी यासाठी ज्या कमकुवत घटकांसाठी आणि कुळ मुंडकारांसाठी रवी नाईक वावरले त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत्या १९ डिसेंबरपर्यंत सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
फर्मागुढी - फोंडा येथील पीएसच्या फार्मसी महाविद्यालय संकुलात बुधवारी दिवंगत नेते रवी नाईक यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी सभापती गणेश गावकर, भाजप प्रदेशध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे,
आमदार गोविंद गावडे, रितेश नाईक, रॉय नाईक तसेच ओबीसी आयुक्त मनोहर आडपईकर, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर, तसेच नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, माजी सरपंच नावेद तहसीलदार, प्रमुख वस्ते जयंत कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सर्वसामान्यांप्रती कळवळा असलेले रवी नाईक हे बहुजनांचे नेते होते. अभ्यास्यू व्यक्तिमत्त्व होते.
त्यामुळे पीडितांचा प्रश्न रवी नाईक विधानसभास धसास लावतताना न्याय मिळवून द्यायचे. त्यांच्या स्मृती जपताना दरवर्षी त्यांच्या नावाने व्याख्यान ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. दामू नाईक म्हणाले की, सामान्य कुटुंबातील रवी नाईक यांनी राजकीय क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करताना धोरणात्मक निर्णय घेतले, असा महान नेता पुन्हा होणे नाही, असे सांगताना त्यांचे कार्य पुढे चालू राहावे, असे दामू नाईक यांनी सुचित केले.
यावेळी सदानंद तानावडे, गणेश गावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि इतरांनी आपले विचार व्यक्त करताना रवी नाईक यांना आदरांजली अर्पण केली. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षण क्षेत्र रवी नाईक यांचे कार्य आणि शिक्षकांची भूमिका यावर विवेशन केले. स्वागत व प्रास्ताविक रितेश नाईक यांनी केले. रॉय नाईक यांनी आभार मानले.
क्रीडा संकुलात अर्धपुतळा
कुर्टी क्रीडा संकुलात रवी नाईक यांचा अर्ध पुतळा उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही कारणास्तव हे काम शिल्लक राहिले होते ते पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. या क्रीडा संकुलाला रवी नाईक यांचे नाव देण्यात आले आहे.