Portuguese Movie Aki | आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आकी’ची चर्चा; उलगडणार नात्यांचा आणि बालमनाचा संघर्ष

Portuguese Movie Aki | गूढता, भावनिक संघर्ष आणि सामाजिक आशय यांची सांगड घालत चित्रपट बालमनाचा वेध घेतो.
Portuguese Movie Aki
Portuguese Movie Aki
Published on: 
Updated on: 

पणजी : दीपक जाधव

पोर्तुगीज दिग्दर्शक तियागो गेडेस यांचा 'आकी' हा चित्रपट केवळ एका कुटुंबाची कथा सांगत नाही, तर बालपण, पालकत्व, ओळख आणि मानवी नात्यांमधील अनाकलनीय गुंतागुंत उलगडण्याचा प्रयत्न करतो. जे. एम. कोएत्झी यांच्या 'जीझस ट्रायोलॉजी' या साहित्यकृतीवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्याच काल्पनिक विश्वात घेऊन जातो. गूढता, भावनिक संघर्ष आणि सामाजिक आशय यांची सांगड घालत चित्रपट बालमनाचा वेध घेतो.

Portuguese Movie Aki
IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत असलेल्या आकीचे प्रदर्शन करण्यात आले. सायमन (मॅनोलो सोलो) आणि सहा वर्षांचा डेव्हिड (अॅलेक्स पेलेझ) हे एकमेकांसाठी अनोळखी असलेले दोघे नोव्हिला या अनोळखी शहरात पोहोचतात. सायमन हा डेव्हिडचा वडील नसतो; मात्र त्याच्यासाठी आईचा शोध घेण्याची जबाबदारी स्वीकारतो.

या शोधप्रवासात त्यांची भेट इनेस (पॅट्रिशिया लोपेझ अर्नाईझ) हिच्याशी होते. सुरुवातीला डेव्हिडची जबाबदारी स्वीकारण्यास विरोध करणारी इनेस नंतर त्याची काळजी घेण्यास तयार होते. हळूहळू सायमन, इनेस आणि डेव्हिड यांच्यात भावनिक नाते निर्माण होते आणि या तिघांचे एक अनोखे कुटुंब आकाराला येते.

दरम्यान, डेव्हिडमधील नृत्यकलेची प्रतिभा लक्षात आल्यानंतर त्याला नृत्य अकादमीत प्रवेश दिला जातो. मात्र, अकादमीतील शिस्त, नियम आणि अपेक्षा यांमुळे त्याच्या स्वातंत्र्याचा आणि नैसर्गिक क्षमतेचा संघर्ष सुरू होतो. स्वतःच्या पद्धतीने विचार करणाऱ्या डेव्हिडला समजून घेण्याऐवजी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यातून मुलांच्या स्वतंत्र विचारांवर बंधने घालणाऱ्या समाजव्यवस्थेचे चित्रण दिग्दर्शकाने केले आहे.

चित्रपटाची गूढ मांडणी, प्रभावी छायाचित्रण आणि नृत्यदृश्ये लक्षवेधी ठरतात. डॅनिएला काजियास यांचे छायाचित्रण प्रत्येक प्रसंगाला वेगळी दृश्यात्मक खोली देते.

Portuguese Movie Aki
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

कलाकारांनी संयत अभिनयातून व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत. विशेषतः बालकलाकार अॅलेक्स पेलेझ याचा अभिनय प्रभावी ठरतो. 'आकी' हा केवळ मनोरंजनाचा चित्रपट नसून बालपणातील निरागसता, पालकत्वाची जबाबदारी आणि मुलांना समजून घेण्याच्या मर्यादांवर विचार करायला लावणारा अनुभव आहे. मुलांना आपल्या अपेक्षांनुसार घडवण्यापेक्षा त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते, हा विचार चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.