

Goa Cultural Awards
पणजी : कुठल्याही क्षेत्रात पारंगत होण्यासाठी नवोदित कलाकारांनी विशिष्ट ध्येय ठेवावे. हे ध्येय साध्य करण्यासाठी कलेप्रति आदर आणि अपार कष्ट करण्याची तयारी ठेवावी तरच यश मिळू शकते. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी मला तब्बल दोन वर्षे काहीही न शिकवता तसेच ठेवले होते. तरीही मी संयम ठेवला. कारण मला त्यांच्याकडूनच गाणे शिकायचे होते. या निर्धारामुळेच मला यश मिळाले व नावलौैकिक मिळाला, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक पं. अजितकुमार कडकडे यांनी केले.
गोव्याचा सर्वोच्च गोमंतविभूषण पुरस्कार मंगळवारी पणजी येथे पं. अजित कडकडे यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कला अकादमीत आयोजित या सोहळ्याला व्यासपीठावर पं. अजितकुमार कडकडे, सौ. छाया कडकडे, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार गोविंद गावडे, केदार नाईक, संकल्प आमोणकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, संचालक सगुण वेळीप व सुनील अंचिपका उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना पं. कडकडे पुढे म्हणाले, आपल्या जन्मभूमीत आपणास आज मिळालेला हा गोमंतभूषण पुरस्कार आपल्यासाठी खास असून तो आपले गुरू पं. अभिषेकी बुवांसह इतर गुरुजनांना व रसिकांचा सन्मान आहे. रसिकांमुळे आपण घडलो, रसिकांनी मला प्रतिसाद दिला नसता तर आपला प्रवास पूर्ण झालाच नसता. वयाच्या 18 व्या वर्षी पं. अभिषेकींचे गाणे डिचोलीत ऐकले व त्यांच्यासारखा गायक होण्याचा ठाम निश्चय केला. मुंबईत गेलो तेव्हा त्यांनी मला ठेवून घेतले. मात्र दोन वर्षे काहीच शिकवले नाही. तरीही तेथेच राहिलो व त्यांच्याकडून शिक्षण घेतले. असा निर्धार नवोदितांनी करावा, असे पं. कडकडे म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, मराठी, कोकणी, हिंदी व कन्नड भाषेत भक्तिगीते व भावगीते पं. कडकडे यांनी गायीली. ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी गोव्यातर्फे आपण त्यांचे अभिनंदन करत आहे. पं. कडकडे यांना शेकडो पुरस्कार मिळाले असतील मात्र त्यांच्या जन्मभूमीने गोव्याचा सर्वोच्च गोमंतविभूषण पुरस्कार देऊन केलेल्या त्यांचा गौैरव फार विशेष आहे. गोवा सरकार मराठी, कोकणी व संस्कृत भाषेसाठी अनेक पुरस्कार देते. नाटक, तियात्र भजन यांना राजाश्रय देते. त्या माध्यमातून गोव्यात दर्जेदार कलाकार व साहित्यिक तयार व्हावेत, हाच सरकारचा हेतू आहे.
खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले, गोव्याचा सर्वोच्च नागरी सन्मान गोमंतविभूषण योग्य व्यक्तीला प्रदान होत आहे. गोव्याच्या त्यांच्या जन्मभूमीत तो प्राप्त होतोय हे त्यांचे भाग्य. त्यांचे गायन एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. पैशाला महत्त्व न देता त्यांनी आवड जपली व यश मिळवले, असे तानावडे म्हणाले.
बाबू गडेकर व साथींच्या दिंडीने विठ्ठल नामाच्या गजरात पं. कडकडे व इतर मान्यवरांना सभागृहात आणण्यात आले. त्यापूर्वी कला दालनात पं. कडकडे यांच्यावरील प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यानी केले.
पं. कडकडे यांना पाच लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असा गोमंतविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वाचे स्वागत संचालक सगुण वेळीप यांनी केले. मानपत्राचे वाचन डॉ. अजय वैद्य यांनी केले. सूत्रनिवेदन सिद्धी उपाध्ये यांनी केले तर आभार उपसंचालक मिलिंद माटे यांनी मानले. कला अकादमीचे मा. दिनानाथ मंगेशकर कलामंदिर पं. कडकडेच्या चाहत्यांनी पूर्ण भरले होते.
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, पं. कडकडे यांना मिळालेला गोमंतभूषण पुरस्कार हा तमाम कलाकार, संगीत व गोवेकरांचा सन्मान असल्याचे सांगितले. त्यांनी अपार कष्ट सोसून केलेली कलेची सेवा आणि अनंतकाळ केलेला सराव त्याचे फळ त्यांना मिळत आहे. त्यांच्या तपश्चर्येनंतर गोमंतविभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. ही खरोखरच गोमंतकीयांसाठी आनंददायी गोष्ट आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, जिद्द ठेवली व कलेवर श्रद्धा ठेवली तर यश मिळू शकते, हे पं. कडकडे यांनी दाखवून दिलेले आहे. त्यामुळे गोव्यातील कलाकारांनी त्यांचा आदर्श घ्यावा. देशातील एकमेव गोवा राज्य नाटक, नृत्य, संगीत शिकण्यासाठी हायस्कूलमध्ये शिक्षक पुरवते. त्या माध्यमातून अजित कडकडे यांच्यासारखे कलाकार तयार व्हावेत. पं. कडकडे यांनी देशातच नव्हे तर जगभर कार्यक्रम केले.
वेळेचे महत्त्व प्रत्येकाने पाळावे, मी आजही ते पाळतो. गेली पन्नास वर्षे मी कधीच रियाज सोडला नाही. गायकांना तो हवाच. महाराष्ट्र माझी कर्मभूमी असली तरी गोवा जन्मभूमी असल्याने आपण तिचा विसर कधीच पडू देणार नाही. असे सांगून आपला देवतांवर विश्वास आहे. त्यामुळे काळजी कधीच करत नाही. सर्वकाही सुरळीत होईल या विश्वासाने आनंदात जगतो, असे पं. कडकडे म्हणाले.