Harhadde Accident case : अजय गुप्ताला 5 दिवस पोलिस, तर लुथरा बंधूंना न्यायालयीन कोठडी
पणजी ः हडफडे दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अजय गुप्ता याची पोलिस कोठडी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने आणखी 5 दिवसांनी वाढवली आहे, तर लुथरा बंधूंना 9 जानेवारी 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. नाईट क्लब असलेल्या जागेचे मूळ मालक असल्याचा दावा करणाऱ्या प्रदीप घाडी आमोणकर यांची हडफडे पोलिसांनी चौकशी करून जबानी नोंदवली.
बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा बंधूंची पोलिस कोठडी आज संपल्याने न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. कोठडीत रवानगी करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी, तसेच ते घेत असलेली औषधे त्यांना घेण्यास परवानगी दिली आहे. म्हापसा पोलिसांनी बनावट दाखलाप्रकरणी लुथरा बंधूंचा भागीदार अजय गुप्ता याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. लुथरा बंधूंनाही या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यांच्या या अटकपूर्व जामिनावर तसेच म्हापसा पोलिसांच्या अर्जावर मंगळवारी 30 रोजी दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार आहे.
सुनावणीदरम्यान अजय गुप्ता याने पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, म्हापसा पोलिसांनी बर्च या आस्थापनेसाठी उत्पादन शुल्क (एक्साईज) परवाना मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप ठेवत अजय गुप्ता याला अटक केली होती. बर्च आस्थापनात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विविध बाबींचा तपास सुरू असून, परवाना प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराबाबतही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हापसा पोलिस करत आहेत.

